(बीड)
मस्साजोग सरपंच हत्या, दोन कोटी रुपये खंडणीच्या गुन्ह्यातील वाल्मीक कराड, सुदर्शन घुलेसह इतर आठ जणांवर खंडणी, हाफ मर्डरसह इतर गंभीर गुन्हे दाखल आहेत. सुदर्शन घुलेविरोधात यापूर्वीही अपहरण केल्याची नोंद आहे. यावरून हे सर्व गुन्हेगार सराईत असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर रोजी अपहरण करून हत्या करण्यात आली होती. यामध्ये सुदर्शन घुलेसह आठ आरोपी आतापर्यंत निष्पन्न झाले आहेत. तर आवादा कंपनीच्या अधिकाऱ्याला दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याच्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मीक कराडसह तिघांविरोधात गुन्हा दाखल आहे. या सर्व गुन्ह्यांचा तपास सध्या सीआयडी करत आहे. आतापर्यंत या दोन्ही गुन्ह्यांत आठ आरोपींना अटक केली आहे. सध्या हे सर्व सीआयडी कोठडीत असून, त्यांची चौकशी केली जात आहे. हे सराईत गुन्हेगार असल्याने त्यांच्यावर विशेष नजर ठेवली जात आहे.
मुख्यमंत्र्यांनी दिले होते आश्वासन
हिवाळी अधिवेशनात या प्रकरणावरून गदारोळ झाला होता. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाईचे आश्वासन दिले होते. तसेच त्यांच्याविरोधात मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचीही ग्वाही दिली होती. त्याप्रमाणे या सर्वांची गुन्हे दाखलची माहिती बीड पोलिसांनी काढली आहे. त्याप्रमाणे या गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाईच्या हालचाली पोलिसांनी सुरू केल्या आहेत.
वाल्मीक कराडला शासकीय बॉडीगार्ड
वाल्मीक कराडविरोधात १५ गुन्हे दाखल आहेत. असे असतानाही त्याला शस्त्र परवाना देण्यात आलेला आहे. तसेच दोन शासकीय बॉडीगार्डही आहेत. तीन महिन्यांसाठी त्याने ९ लाख ७२ हजार रुपये शुल्कही भरले होते. आता २५ जानेवारी रोजी याची मुदत संपणार होती, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
कोणावर किती गुन्हे
सुदर्शन घुले – १९
सुधीर सांगळे – २
कृष्णा आंधळे – ६
जयराम चाटे – ३
महेश केदार – ६
प्रतीक घुले – ५
विष्णू चाटे – २
वाल्मीक कराड – १५