(चिपळूण)
कोकणातील पर्यटनाला चालना मिळण्यासाठी तसेच बचत गटांच्या महिलांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने वाशिष्ठी दाभोळ खाडीत हाऊसबोटचा प्रकल्प राबवण्यात येत आहे. मालदोली प्रभाग संघाच्या महिला हा प्रकल्प राबवणार आहेत. या खाडीत सफर करताना केरळ पेक्षाही अप्रतिम निसर्ग सौंदर्याची अनुभूती पर्यटकांना घेता येणार आहे. पर्यटनाला चालना देण्यासाठी महाराष्ट्रात प्रथमच रत्नागिरी जिल्ह्यात पाच ठिकाणी हाऊसबोट प्रकल्प सुरू होत आहे. त्यामध्ये चिपळूण येथील वाशिष्ठी दाभोळ खाडीचाही समावेश आहे.
चिपळूण येथील कालुस्ते दरम्यान हाऊसबोटने पर्यटकांना निसर्गाची अनुभूती घेता येणार आहे. हाऊस बोटीतून सफर करताना दाभोळ वाशिष्टी खाडीतील जैव विविधता, मगर सफारी, पांडवकालीन लेणी, गरम पाण्याचे कुंड, कांदळवणाची बेटे, नारळी पोकळीच्या बागा या निसर्गरम्य परिसराचा अनुभव घेता येणार आहे. एक कोटी खर्चाच्या या हाऊसबोटमध्ये दोन वातानूकुलीत खोल्या असून त्यात प्रशस्त असे बेड, सोफा बाथरूमची व्यवस्था आहे. फाईव्ह स्टार हॉटेल सारखीच व्यवस्था या खोल्यांमध्ये आहे. शिवाय बोटीला पाच फुटाचा रॅम असून पर्यटन पर्यटकांना खाडीत मासेमारी, त्याच पद्धतीने फीश मसाज देखील करता येणार आहे.
दुसऱ्या मजल्यावर देखील चांगली सुविधा देण्यात आली आहे. हा प्रकल्प सुरळीतपणे चालण्यासाठी सहभागी 36 महिलांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. या प्रकल्पाचे व्यवस्थापन त्याचे मार्केटिंग याबाबतची माहितीही त्यांना दिली आहे. सर्वसाधारण हाऊस बोटिंग मधून 24 तासासाठी एका खोलीसाठी सुमारे 15 हजाराचा खर्च अपेक्षित आहे. एका बोटीत दोन खोल्या आहेत. पर्यटकांना जेवण, चहा, नाश्ता, वेलकम ड्रिंक, कोकम, शाकाहारी-मांसाहारी जेवण सायंकाळी पुन्हा चहा नाश्ता, रात्रीचे जेवण मिळणार आहे. सुमारे वर्षाकाठी सुमारे एक ते दीड कोटीची उलाढाल या प्रकल्पातून अपेक्षित आहे. हा प्रकल्प सुरळीतपणे सुरू होण्यापूर्वी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उमेदच्या अधिकाऱ्यांनी तसेच सहभागी महिलांनी केरळमधील हाऊस बोट प्रकल्पाची पाहणी केली आहे.
मालदोली येथील अग्नीपंख महिला प्रभाग संघ हा प्रकल्प राबवणार आहे. या प्रभाग संघात 355 स्वयंसहायता समूह 18 ग्रामसंघ तर 3847 महिला सहभागी आहेत. सिंधू रत्न योजनेतून हा प्रकल्प लवकरच सुरू होत आहे. प्रकल्प सुरळीतपणे चालण्यासाठी या महिलांच्या व्यवस्थापन, देखरेख, विपणन, लेखा अशा चार समित्यांच्या स्थापना केल्या आहेत. या प्रकल्पाबाबत जागृती होण्यासाठी कॉफी टेबल बुकची ही निर्मिती केली आहे. बोट सुरक्षित राहण्यासाठी काही ठिकाणी खाडीत फ्लोटिंग जेटीची देखील उभारणी केली जाणार आहे.
याबाबत अग्निपंख महिला प्रभाग संघ मालदोलीच्या अध्यक्ष दीपिका कुळे यांनी सांगितलं की, वाशिष्टी दाभोळखाडीत नयनरम्य असा निसर्ग परिसर आहे. पर्यटकांनी हाऊस बोट मधून निसर्गाची पाहणी केल्यास पुन्हा ते सातत्याने इकडे आकर्षित होतील, अशी निसर्गाची उधळण येथे पाहायला मिळते. हा प्रकल्प यशस्वीपणे आम्ही राबवू असा आम्हाला विश्वास आहे.
कॉफी टेबल बुकची ही निर्मिती
महाराष्ट्रात पाच ठिकाणी हाऊसबोट प्रकल्प सुरू होत आहे. यामध्ये चिपळूण येथील वाशिष्ठी दाभोळ खाडीचाही समावेश आहे. हा प्रकल्प सुरळीतपणे चालण्यासाठी सहभागी 36 महिलांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. मालदोली येथील अग्नीपंख महिला प्रभाग संघ हा प्रकल्प राबवणार आहे. या प्रकल्पाबाबत जागृती होण्यासाठी कॉफी टेबल बुकची ही निर्मिती करण्यात आली आहे.