(सोलापूर)
मुलींना मोफत उच्च शिक्षणाच्या घोषणानंतर आता वसतिगृह निर्वाह भत्ताही देणार असल्याची मोठी घोषणा राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. ज्या मुला-मुलींना महाविद्यालयाचे, शासकीय हॉस्टेल मिळालेले नाही, अशांना सरकार निर्वाह भत्ता देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. मेट्रोसिटीत ६ हजार, शहरात ५,३०० तरी तालुका पातळीवर ३,८०० प्रतिमहिना भत्ता दिला जाणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
१ जून पासून उच्च शिक्षण घेणा-या महाराष्ट्रातील सर्व मुलींची १०० टक्के फी राज्य सरकार भरणार आहे. महाराष्ट्रातील मुलींना फी नसल्यामुळे शिकता येत नाही, असे होणार नाही. मुलींच्या फीसाठी आम्ही १ हजार कोटी रुपयांची तरतूद करणार आहोत. मंत्रिमंडळाच्या उपसमितीमध्ये याबाबतचा निर्णय झाला असून लवकरच कॅबिनेटचा निर्णय होऊन जीआर निघणार आहे. त्याचबरोबर ज्या मुला-मुलींना वसतिगृह मिळालेले नाही, अशांना निर्वाह भत्त्याची तरतूद करण्यात येणार आहे. मेट्रो सिटीमधील विद्यार्थी-विद्यार्थिनीना दरमहा ६ हजार, त्यापेक्षा छोट्या शहरांमध्ये ५ हजार ३०० तर तालुका स्तरावर ३ हजार ८०० रुपये प्रतिमहिना निर्वाह भत्ता मिळणार आहे. या निर्णयामुळे शिक्षणाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढेल, अशी आशा आहे. हा भत्ता डिबीटीद्वारे थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात देण्यात येणार आहे.