(रत्नागिरी)
गेले अनेक महिने रखडलेल्या जिल्हा परिषद कर्मचारी भरतीला मुहूर्त मिळाला होता. कंत्राटी ग्रामसेवक, आरोग्य सेवक यांची लेखी परीक्षा १० जूननंतर होणार होती. तसे वेळापत्रक जाहीरसुद्धा झाले होते. मात्र, कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता जारी झाल्याने ही परीक्षा स्थगित करण्यात आली होती. आता ही आचारसंहिता उठली असल्याने या भरतीला लागलेले ग्रहण लवकरच सुटण्याची आशा निर्माण झाली आहे.
जिल्हा परिषद वर्ग ३ व ४ ची भरती प्रक्रिया गेल्या ७ महिन्यांपासून सुरू झाली. यामध्ये विविध संवर्गाच्या ७०० जागा रिक्त होत्या. त्यासाठी भरती प्रक्रिया होती. यापैकी अनेक जागांसाठी लेखी परीक्षाही घेण्यात आली होती. मात्र, मध्यंतरी यातील काही संवर्गातील पदांसाठी भरतीवर आक्षेप घेत काही उमेदवार न्यायालयात गेले होते. विशेषतः ग्रामसेवक पदासाठी उमेदवार न्यायालयात गेले होते. हा विषय न्यायालयाने निकाली काढत भरती करण्याचे आदेश दिले होते. परंतु, त्याच दरम्यान लोकसभा निवडणूक आल्याने ही भरती प्रक्रिया रखडली. निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर आता ही भरती प्रक्रिया होणार होती. मात्र, पुन्हा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने या भरतीला पुन्हा स्थगिती देण्यात आली होती.
कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लागल्याने ही भरती प्रक्रिया पुढे गेली होती. आता ही आचारसंहिता उठविण्यात आली असून, या भरतीला लागलेले ग्रहण लवकरच सुटणार, अशी अपेक्षा उमेदवारांकडून व्यक्त केली जात आहे.