(संगमेश्वर / प्रतिनिधी)
महेंद्र सखाराम वारोशे यांनी व्यापारी पैसा फंड संस्थेच्या पैसा फंड इंग्लिश स्कूल संगमेश्वर येथे सेवक म्हणून केलेली पंचवीस वर्षाची सेवा संस्था आणि शाळेच्या कायम स्मरणात राहील. आपल्या गावातील अधिकाधिक मुले आपल्याच प्रशालेत आणण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असे. त्यांचा शांत आणि मनमिळाऊ स्वभाव या त्यांच्या जमेच्या बाजू होत्या, असे प्रतिपादन व्यापारी पैसा फंड संस्था संगमेश्वरचे अध्यक्ष अनिल शेट्ये यांनी केले.
पैसा फंड इंग्लिश स्कूल संगमेश्वर येथे सलग २५ वर्ष सेवक म्हणून काम केल्यानंतर महेंद्र सखाराम वारोशे हे नुकतेच सेवानिवृत्त झाले. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून त्यांचा सन्मान करण्याचा कार्यक्रम प्रशालेत आयोजित करण्यात आला होता. यावेळी व्यासपीठावर संस्थाध्यक्ष अनिल शेट्ये, उपाध्यक्ष किशोर पाथरे, सचिव धनंजय शेट्ये, सदस्य संदीप सुर्वे, रमेश झगडे, मुख्याध्यापक सचिनदेव खामकर पर्यवेक्षक दिलीप मोरगे , मुरलीधर बोरसुतकर, नंदकुमार कुष्टे, बाबा नारकर, अभिषेक विचारे, समीर शेरे, सतीश पटेल आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रशालेचे मुख्याध्यापक सचिनदेव खामकर यांनी महेंद्र वारोशे यांच्या सेवक म्हणून केलेल्या कार्याचा आढावा घेतला. संस्थेच्या वतीने अध्यक्ष अनिल शेट्ये यांच्या हस्ते शाल – पुष्पगुच्छ, गणपतीची चांदीची प्रतिमा देऊन वारोशे यांचा सन्मान करण्यात आला. प्रशालेच्या वतीने मुख्याध्यापक सचिनदेव खामकर यांनी महेंद्र वारोशे यांना पोशाख, पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान केला. प्रशालेचे शिक्षिका श्रीमती पांढरे यांनी सौ.वारोशे यांचा साडी, ओटी देऊन प्रशालेच्या वतीने सन्मान केला.