(संगमेश्वर / प्रतिनिधी)
दरवर्षी २६ जुलै हा कारगिल विजय दिन म्हणून साजरा केला जातो. यंदा या कारगिल विजय दिनाचा रौप्यमहोत्सव साजरा केला जात आहे. १९९९च्या कारगिल युद्धादरम्यान भारतीय सैनिकांनी केलेल्या बलिदानाचे स्मरण आणि सन्मान म्हणून हा दिवस संपूर्ण देशभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. याच भावनेतून कारगिल युध्दात द्रास सेक्टर येथे लढलेले व सध्या बँक ऑफ इंडिया शाखा संगमेश्वर येथे कार्यरत असलेल्या राजेंद्र तातोजी शिंदे यांचा श्रमिक कृषी संवर्धन संस्था, आरवली व आयडियल ग्रुप, कडवईच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला.
राजेंद्र शिंदे हे १९९३ साली बेळगाव येथे प्रशिक्षण घेऊन मराठा लाईफ इन्फ्रंन्ट्रीमध्ये दाखल झाले. या युनिटमध्ये काम करत असतानाच त्यांची सिमला येथे पॅरा कमांडो ट्रेनिंगसाठी निवड झाली. इथेच त्यांनी वॉटर डायव्हिंग व स्काय डायव्हिंग हे कोर्सदेखील पूर्ण केले. कारगिल युद्धावेळी ते आसाममध्ये कार्यरत होते तिथून त्यांना द्रास सेक्टरला नेण्यात आले. तेथील परिस्थितीची जुळवून घेत सर्वात कठीण असे सर्व्हिलन्सचे काम त्यांच्या टीमला मिळाले. पाकिस्तानचे सैन्य कुठे – कुठे पसरले आहे, त्यांच्याजवळ कोणते युद्ध साहित्य आहे याचे विश्लेषण करण्याची जबाबदारी त्यांच्या टीमवर होती. हे काम यशस्वीरीत्या पूर्ण करून पाकिस्तानवर विजय मिळवून देण्यात त्यांचा मोठा हातभार लागला.त्यांच्या या यशाबद्दल त्यांना कारगिल विजय पदक देऊन गौरविण्यात आले होते.
राजेंद्र शिंदे यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना विविध संस्थांनी सन्मानित केले.यावेळी श्रमिक कृषी संवर्धन संस्थेचे अध्यक्ष विलास डिके, आयडियल ग्रुप कडवई अध्यक्ष निलेश कुंभार, मैत्री सामाजिक संस्था,कडवई सचिव मिलिंद कडवईकर, सदस्य रुपेश कुळ्ये, प्रा.शुभम शिंदे यांनी त्यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व शिवशाही हे पुस्तक देऊन सन्मानित केले.