(लांजा)
रत्नागिरी जिल्हा परिषद अंतर्गत नुकत्याच घेण्यात आलेल्या हिवाळी क्रीडा स्पर्धेमध्ये जिल्हा परिषद शाळा देवधे मनचेच्या विद्यार्थ्यांनी लहान गट मुली खो-खो चे विजेतेपद तर लहान गट मुली कबड्डीचे उपविजेतेपद पटकाविले होते. यामध्ये देवधे मणचे शाळेच्या विद्यार्थ्यांसोबत देवधे गुरववाडी, कोचरी नं.१, आसगे नं.१, साठवली महम्मदवाडी आणि पुनस कडू शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
या सर्व शाळांमधील यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण समारंभ जिल्हा परिषद शाळा देवधे मणचे येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व अर्थ समिती सभापती माननीय चंद्रकांतजी मणचेकर साहेब उपस्थित होते. यावेळी यशस्वी सर्व विद्यार्थ्यांना सभापती मणचेकर साहेब यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. यावेळी त्यांनी जिल्हा स्पर्धेत एकाच शाळेने दोन पथकांची केलेली कमाई बद्दल विद्यार्थ्यांचे कौतुक केले. खेळाचे गुण मिळवून नोकरी संपादन करता येते याविषयी मार्गदर्शनही केले.
यावेळी तालुका क्रीडा सराव शिबिराकरिता येथेच्छ देणगी देणाऱ्या देणगीदार शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी देवधे मणचे, देवधे गुरववाडी, कोचरी न.१, आसगे नं.१, साठवली महम्मदवाडी आणि पुनस कडू शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.