कॉफी बीन्स : आपली कॉफी फ्रिजमध्ये ठेवू नका. फ्रीजमध्ये ठेवल्याने तिची चव कमी होते, तसेच कॉफी आर्द्र बनते; त्यामुळे आपल्या कॉफीचा स्वाद बिघडतो. त्याऐवजी कॉफी बॅग, कॅन किंवा सीलबंद जारमध्ये काउंटरवर, बाहेर ठेवा.
सफरचंद : घरी येणाऱ्या पाहुण्यांना आपल्या स्वयंपाकघरातील डायनिंग टेबलवरचा सफरचंदांचा एक गुलाबी वाडगा दाखवण्याचा मोह आपल्याला होतो. परंतु तोच वाडगा फ्रीजमध्ये ठेवल्यास सफरचंदाचे आयुष्य वाढू शकते. मात्र त्यांना प्लास्टिकच्या पिशवीत घालून ठेवल्यास ती लवकर खराब होत नाहीत.
औषधी वनस्पती आणि मसाले : बरेच लोक आपले कोरडे मसाले आणि औषधी वनस्पती फ्रिजमध्ये किंवा स्वयंपाकाच्या शेगडीच्या वर फळीवर ठेवतात. ओलावा, उष्णता आणि प्रकाशामुळे या मसाल्यांना तेल सुटू शकते, ज्यामुळे त्यांचा फ्लेवर कमी होतो. त्यापेक्षा मसाले बरणीत भरुन कपाटात ठेवा.
दाणे : ड्रायफ्रूट्स किंवा दाणे हे काही आठवड्यांपेक्षा जास्त काळ उघड्या वातावरणात चांगले राहू शकत नाहीत. अक्रोड, काजू आणि बदामांसारखे ड्रायफ्रूट्स फ्रीजमध्ये ठेवण्याची आवश्यकता आहे, जिथे ते नऊ महिने चांगले टिकतात.
मेपल सिरप : बर्याच लोकांना असे वाटते की शुद्ध आणि कृत्रिम मेपल सिरप साठवण्यासाठी एकसारख्याच साठवणपद्धती वापरतात. परंतु सहा महिन्यांची एक्सपायरी डेट असणारे शुद्ध मेपल सिरप फ्रिजमध्ये ठेवणे महत्वाचे आहे.
ब्राऊन साखर : आपली ब्राऊन शुगर फ्रिजमध्ये ठेवल्यास तिला आपोआप ओलसरपणा येतो. उघड्या हवेतही तिला ओलसरपणा येतो. साखरेला ओलसरपणा येऊ नये म्हणून ती सर्वसामान्य तापमानाला हवा बंद डब्यात ठेवावी.
सॉस : आपल्या सॉसला सर्वसामान्य तापमानावर ठेवल्यास तो खराब होईल अशी भीती बाळगू नका. या तापमानाला तो तीन वर्षापर्यंत सुरक्षित राहू शकतो. हा सॉस फ्रिजमध्ये ठेवण्याची काहीही आवश्यकता नाही.
टोमॅटो : टोमॅटो फ्रीजमध्ये ठेवणे आपल्याला सर्वसाधारण बाब वाटेल, परंतु त्यामुळे टोमॅटोची चव कमी होते. त्यामळे टोमॅटो सरळ आपल्या स्वयंपाकघराच्या काउंटरवर परंतु पसरून ठेवा. ज्यामुळे त्यांची चव कायम राहील आणि ते खराब होणार नाहीत. टोमॅटोमध्ये स्वाद उत्पन्न करणारी एन्झाइम्स कमी तपमानाला नष्ट होतात. टोमॅटो घेतानाही कडक आणि छोटे असे पाहून घ्यावेत, म्हणजे ते जास्त टिकतात.
केळी, अननस अशी उष्ण कटिबंधीय फळं : केळी आणि अननस ही दोन्ही फळं उष्ण कटिबंधातली आहेत. त्यामुळे ती फ्रिजमध्ये ठेवण्याचा काहीही फायदा होत नाही. उलट त्यातून बाहेर पडणाऱ्या इथिलीनसारख्या वायूमुळे इतर पदार्थांचा स्वाद बिघडतो किंवा त्यांच्या आजूबाजूचे पदार्थ लवकर खराब व्हायला लागतात. तसंच ही फळं बाहेर रूम टेम्परेचरलाही जास्त दिवस साठवता येत नाहीत. त्यामुळे त्यांचं अकाली पिकणं किंवा काळं पडणं टाळण्यासाठी ती प्लॅस्टिक फिल्ममध्ये गुंडाळून किंवा पेपर बॅगमध्ये घालून थंड व अंधाऱ्या जागी ठेवावीत.
कच्चे मांस : कच्चे मांस फ्रिजच्या वरच्या भागात ठेवू नका. जरी ते लवकर खराब होत नसले तरी त्याच्यामुळे इतर पदार्थ खराब होऊ नयेत म्हणून ते फ्रीजच्या सर्वात खालच्या शेल्फवर ठेवणे चांगले असते. चिकन, मटण शक्यतो ताजंच वापरावं. फ्रिजमध्ये ठेवावं लागलंच तरी दोन दिवसांत वापरावं. मांसामध्ये जंतूंची वाढ खूप जलदगतीने होते. त्यामुळे दोन तीन दिवसांपेक्षा जास्त काळासाठी मांस टिकवायचं असेल तर मोठ्या भांड्यात व्हिनेगर आणि मीठ घालून त्यात मांस बुडवून ठेवावं.
ऑलिव्ह ऑईल : सर्वसाधारणपणे स्वयंपाकघरातील गॅस शेगडीच्या जवळपास काचेच्या बाटलीत ऑलिव्ह ऑइल ठेवलेलं दिसते. परंतु ते तेल उष्णता आणि सूर्यप्रकाशामुळे जलद ऑक्सिडाईझ होते आणि त्यामुळे त्याची चव कमी होते. यासाठी उष्ण ठिकाणापासून ते दूर ठेवा.
कांदे आणि लसूण : स्वयंपाकघरात जाळीच्या टोपलीत कांदे आणि लसूण साठवून ठेवणे हा योग्य मार्ग आहे. त्यांना खेळती हवा मिळाली तर त्यांचे आयुष्य वाढते, त्यामुळे ते फ्रिजमध्ये ठेवू नका. बऱ्याच गृहिणी कांदे, बटाटे, लसूण हे ठेवण्याची जी जाळी किंवा टोपली असते ती लख्ख उजेड आणि ऊन असेल अशा जागी ठेवतात. कांदे आणि लसूण यांना टिकण्यासाठी उब आवश्यक असली तरी उजेड हा त्यांचा शत्रू आहे. त्यामुळे कांदे आणि लसूण उजेडात न ठेवता अंधाऱ्या जागी साठवावेत. मात्र त्या जागी हवा पुरेशी खेळती असावी. त्यासाठी ते सच्छिद्र टोपलीत आणि जमिनीपासून काही उंचीवर साठवावेत. कांदा चिरून तो लगेच वापरायचा नसेल तर फ्रीजमध्ये ठेवायची पण बऱ्याच जणींना सवय असते. हे टाळावं. कांदा चिरल्यावर लगेचच त्याचं ऑक्सिडेशन सुरू होतं. तो कच्चा तसाच दीर्घकाळ ठेवल्यास त्यात अनेक हानिकारक रसायनं निर्माण होऊ शकतात. हे टाळण्यासाठी कांदा चिरल्यावर लगेच वापरावा.
बटाटे : बटाटेही फ्रिजमध्ये न ठेवता अंधाऱ्या पण कोरड्या, हवा खेळती राहील अशा जागी कोरड्या पेपरबॅगमध्ये किंवा सच्छिद्र टोपलीत ठेवावेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कांदे आणि बटाटे एकाच रॅकमध्ये ठेवू नयेत. कांद्यातून सिनप्रोप्नाथियल एस ऑक्साईड नावाचा वायू बाहेर पडत असतो. त्यामुळे बटाटे लवकर खराब होतात. केळी, सफरचंदं अशा फळांजवळ पण बटाटे ठेवू नयेत, कारण या फळांमधून बाहेर पडणाऱ्या इथिलीन वायूमुळे बटाटे कुजण्याची प्रक्रिया सुरू होते.
हिरव्या पालेभाज्या : बहुतेक घरांमध्ये पालेभाज्या निवडून, प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये भरून मग फ्रिजमध्ये ठेवल्या जातात. पण फ्रिजमधल्या गारव्यामुळे आणि पालेभाजीच्या पानांमधून बाहेर पडणाऱ्या बाष्पामुळे या पिशवीची आतली बाजू ओलसर होते. त्यामुळे भाजी सडायला लागते. हे टाळण्यासाठी त्या कापडी पिशव्यांमध्ये किंवा पेपर बॅगमध्ये घालून मग त्या फ्रिजमध्ये ठेवाव्यात.
अंडी : अंडी साठवताना अनेकवेळा चुकीच्या पद्धतीने ठेवली जातात. अंडी नेहमी अरुंद टोक खाली येईल अशा प्रकारे फ्रिजमध्ये एग ट्रेमध्ये ठेवावीत. मात्र बहुतेकदा हा ट्रे फ्रिजच्या दारात असतो, आणि गंमत म्हणजे या भागाचं टेम्परेचर जास्त असतं. अंडी नेहमी थंड तापमानाला साठवली पाहिजेत. त्यामुळे फ्रिजचं दार ही त्यासाठी योग्य जागा नाही. फ्रिजमध्ये डेअरी सेक्शनमध्ये (जो वरच्या भागात असतो) कार्टनमध्ये घालून अंडी साठवणं हा उत्तम पर्याय.