(रत्नागिरी)
शेअर मार्केटमध्ये जास्त नफ्याचे आमिष दाखवून जयगड येथील एकाची तब्बल २१ लाखांची ऑनलाइन फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी जयगड पोलिस स्थानकात हर्ष वर्मा याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी सोम्या कान्ति नियोगी (रा. जेएसडब्ल्यू टाउनशिप चाफेरी, रत्नागिरी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, संशयित हर्ष वर्माने फिर्यादीचा मोबाइल नंबर मार्केट मास्टर हब या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉइंट केला. त्यानंतर एक लिंक तयार करून त्यात नियोगी यांचे खाते तयार करून ती लिंक पाठविली.
त्यानंतर सोम्या नियोगी यांनी ती लिंक ओपन केल्यावर संशयिताने त्यांना वेगवेगळ्या कंपन्यांचे शेअर्स ५ टक्के, १० टक्के वाढणार आहेत, असे भासवून जास्त नफ्याचे आमिष दाखवून पैसे गुंतवण्यास भाग पाडले. त्यावर विश्वास ठेवून नियोगी यांनी २१ लाख रुपये गुंतवले; परंतु नफा न मिळता गुंतवलेले पैसेही परत न मिळाल्याने त्यांनी फिर्याद दिली आहे.
संशयितावर गुन्हा
फसवणुकीची ही घटना २३ मे २०२४ ते २२ जुलै २०२४ या कालावधीत घडली आहे. याप्रकरणी संशयिताविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३१८ (४), माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६ (ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.