(रत्नागिरी)
शहरातील एमआयडी परिसरात दारूच्या पार्टीवरून तुंबळ हाणामारी झाल्याची घटना काल रात्रीच्या सुमारास घडली आहे. या घटनेनं शहरात सर्वत्र जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
दारुच्या नशेत एकाने अपशब्द उच्चारले, तिथे असणाऱ्या मित्रांनी एकमेकाला सारवासारव करण्यास सुरुवात केली. मात्र हाणामारी सुरुच झाली या हाणामारीचे रूपांतर जोरदार राड्यात झाले. ही दारूची पार्टी एका राजकीय पक्षामधील मित्रांची होती. यातून या जोरदार राड्याला सुरुवात झाल्याने समर्थकांनी राडा थांबण्याचे प्रयत्न केले, मात्र प्रकरण चिघळत गेले. एका मित्राने दुसऱ्यावर हात उगारल्यानंतर त्याच्या समर्थकांनी त्या मित्राला मारहाण करण्यास सुरुवात केली आणि मग दुसऱ्या मित्राचेही सहकारी घटनास्थळी दाखल होऊन समोरासमोर आले. साधारण 50 ते 60 जणांचा जमाव जमल्याने येथे एकच खळबळ माजली होती.
एकाच पक्षांच्या दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची चर्चा सुरू आहे. या राड्यात एका पक्षाचा मोठा पुढारी सहभागी झाला होता. तो देखील जखमी झाल्याचे वृत्त आहे. हा सर्व प्रकार घडताना रत्नागिरी एमआयडीसी परिसरातील रहिवासी देखील घराबाहेर आले होते. सुरू असलेला राडा पाहून त्यांनी देखील आश्चर्य व्यक्त केले. त्यानंतर ही घटना रत्नागिरी शहरात सर्वत्र पसरली. यातून आता जखमी झालेला पुढारी कोण ? कोणत्या पक्षाची पार्टी होती ? असे अनेक प्रश्न उपस्थित करून चौकाचौकात उलटसुलट चर्चा रंगू लागल्या आहेत.