(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर तालुक्यातील फुणगूस खाडीभागाला परतीच्या पावसाचा जोरदार तडाखा बसला असून कोंडये तसेच मेढे गावांत घरावर विजेचे लोळ तसेच झाड पडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची घटना घडली आहे. सतत आठ दिवस गडगडाट आणि लखलखाट करून येणाऱ्या परतीच्या पावसामुळे जनजीवनसुद्धा विस्कळीत झाले असून हातातोंडाशी आलेले भात पीक सततच्या पावसामुळे वाया जाणार या भीतीत शेतकरी वर्गही धास्तावला आहे.
गेले आठ दिवस दुपार नंतर परतीचा पाऊस अक्षरशः धुमशान घालत आहे. कानठळ्या बसतील असा गडगडाट, डोळे दीपतील असा विजांचा लखलखाट आणि जोरदार सोसाट्याच्या वाऱ्याची सोबत घेऊन येणाऱ्या परतीचा पाऊस फुणगूस खाडी परिसरातील गावांत अक्षरशः धुमाकूळ घालत असून काळ मंगळवारी रात्री खाडीभागात वीजांच्या कडकडाटासह आलेल्या पावसाची अविश्रांत बॅटिंग सुरु असतानाच कोंडये बोमेवाडी येथील संजय आत्माराम सावंत यांच्या घरावर कानठळ्या बसणारा आवाज होत विजेचा भलामोठा लोळ पडला. आणि सावंत कुटुंबियांची अक्षरशः तारांबळ उडाली. संपूर्ण कुटुंब भयभीत झालं. मात्र जीवावरच घरातील विद्युत उपकरणावर निभावलं, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कारण घरातील विद्युत उपकरणे जळून खाक झाली. मात्र सुदैवाने कोणतीही इजा कुटूंबीयांना झाली नाही.
भिंतीना तडे, विद्युत उपकारणे जळून खाक
विजेचा लोळ पडून संजय सावंत यांच्या घराच्या भिंतीना मोठ्या प्रमाणात तडे गेले आहेत. तर पंखे, फ्रिज,पाण्याचा पंप, वीज मिटर, घरातील, वीज फिटिंग जळून खाक झाल्याने सावंत कुटूंबाना चांगलाच फटका बसला आहे. तर सुरेश बोमे यांच्या घरावर सुद्धा वीज कोसळून त्याचा चांगलाच हादरा कुटूंबियांना बसला मात्र कुटूंबियांना इजा झाली नसली तरी घरातील विद्युत उपकरणे मात्र जळून खाक झाल्याने त्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
नुकसानीचा फटका
फुणगूस तलाठी कार्यालयाचे तलाठी, मंडळ अधिकारी, कोंडये गावचे सरपंच, पोलीस पाटील, महावितरण अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीची पाहणी करून रीतसर पंचनामा केला.
उभ्या झाडावर वीज कोसळून फांद्या घरावर
मेढे गावाला सुद्धा परतीच्या पावसाचा जोरदार तडाखा बसला असून येथील ग्रामपंचायत कर्मचारी राजेंद्र देसाई यांच्या घराच्या शेजारी असलेल्या आंब्याच्या भल्यामोठ्या झाडावर वीज कोसळून झाडाच्या फ़ांद्या घरावर पडल्याने घरावरील पत्रे तुटून पावसाचे संपूर्ण घरात येऊ लागले. त्यामुळे त्यांची चांगलीच तारांबळ उडाली. त्यांना काय करावे काही सुचेना झाले होते, तर घरात पावसाच्या जलधारा लागल्या होत्या. अशा अवस्थेत भर पावसात आणि विजप्रवाह नसल्याने काळोखात शेजारच्या लोकांच्या मदतीने घरावर पडलेल्या फांद्या मोठ्या कसरतीने बाजूला करून तुलेल्या पत्रऱ्यांवर प्लाटीक टाकले. तोपर्यंत संपूर्ण घरात तलावाचे रूप आले होते. पावसाच्या पाण्यामुळे सामानसुमान भिजून ओलेचिंब झाले. तसेच दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत वीज प्रवाहातील बिघाड काढण्यात आले नसल्याने घरातील विद्युत उपकरणे शाबीत आहेत की नाही, हे मात्र समजू शकले नाही.
याच गावातील सुहास सीताराम तोरसे यांच्या घरावर सोसाट्याच्या वाऱ्याने झाड घरावर कोसळून घरावरील पत्रे तुटले तसेच घरातील टीव्ही आदी विद्युत साहित्यांचे नुकसान झाले असून या दोन्ही ठिकाणचे पंचनामे तलाठी यांनी पूर्ण केले असले तरी येथील नव्याने रुजू झालेले माने नामक तलाठी यांनी उशीराने पंचनामे करतानाच आपत्तीग्रस्त राजेंद्र देसाई यांना उडवाउडवीची देऊन एकप्रकारे त्यांच्या भावना दुखावण्याचा प्रकार केला असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. याची त्वरित दखल घेऊन याबाबत उचित कार्यवाई करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.