(राजापूर)
तालुक्यातील खरवते येथे सोमवारी सायंकाळी मुसळधार पावसासह वीज पडल्याची घटना घडली आहे. यामध्ये घराची कौले, वीजमीटर जळण्यासह इलेक्ट्रीक साहित्य खराब होऊन नुकसान झाले आहे. नियमित मान्सून सुरू होण्यापूर्वी वीज पडण्याची यावर्षीची ही तालुक्यातील पहिली घटना घडली आहे. वीज पडून नुकसान होण्याव्यतिरीक्त धाऊलवल्ली पोकळेवाडी येथे एका घराच्या छपराचे पत्रे उडून नुकसान झाले आहे. तर, आंबा कलमाची झाडे मोडून आणि झाडावरून आंब्याची फळे पडून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
सोमवारी सायंकाळी तालुक्यामध्ये जोरदार पाऊस पडला. यामध्ये पावसासोबत सोसाट्याचा वारा, ढगांचा गडगडाट आणि वीजांचा कडकडाट होता. सुमारे अर्धा तास कोसळलेल्या पावसामुळे अनेक गावांमधील वीजपुरवठा खंडित झाला होता. रात्री उशीरा खंडित झालेला वीजपुरवठा कार्यान्वित झाला होता. या पावसामध्ये खरवते गावठाणवाडी येथील झिमाजी कातकर यांच्या घरावर वीज पडल्याची घटना घडली. सायंकाळी ५.३० वा. च्या सुमारास जोरदार पाऊस सुरू असताना ही वीज पडली. यावेळी घरामध्ये माणसे होती. मात्र, सुदैवाने त्यांना कोणतीही इजा झालेली नाही. मात्र, घरांवरील पत्र्यांसह कौलाचे नुकसान झाले आहे. त्याचवेळी घरातील वीजमीटर जळून इलेक्ट्रीक साहित्य खराब होऊन नुकसान झाले आहे. धाऊलवल्ली पोकळेवाडी येथील रमेश पोकळे यांच्या घराला पावसासोबत सुरू असलेल्या सोसाट्याच्या वाऱ्याचा तडाखा बसला. यामध्ये त्यांच्या घराच्या छपराचे पत्रे उडून नुकसान झाले.