(रत्नागिरी)
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हळूहळू विष पेरले असून, त्याची विषवल्ली इतकी पसरली की आज त्याचा दहा तोंडी नाग तयार झाला आहे. हा नाग लोकशाहीला डसणारा असून, त्याला लोकशाहीची ताकद दाखवावी लागेल, असे मानवी हक्क, संविधान विश्लेषक व कायदेतज्ज्ञ ॲड असीम सरोदे यांनी केले. भारतीय जनता पार्टी आणि विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्या नेतृत्वाखालील भाजपला पाडण्याची वेळ आली असल्याचेही त्यांनी सांगितले.
काँग्रेसच्या भ्रष्टाचाराला कंटाळून नागरिकांनी यांच्यावर विश्वास ठेवला आणि यांना निवडून दिले; मात्र आपण भस्मासुराला पाळतोय हे आपल्या लक्षात आले नाही. आता हा भस्मासुर लोकशाहीच्या डोक्यावर बसलाय. लोकशाही वाचवायची असेल तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना पाडा. कारण भाजप आणि विशेषतः यांच्या नेतृत्वाखालचा भाजप हा भ्रष्टाचारी आणि धर्मांध दोन्ही आहे, हे विदारक एकत्रीकरण असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी ॲड सरोदे पुढे म्हणाले की, धर्म, जात याला भाजपकडून महत्त्व दिले जात आहे. ते केवळ राजकारणासाठी असून हिंसेचा आणि भाजपचा जवळचा संबंध आहे. हे मोदी सरकार की भारत सरकार हा प्रश्न आहे. त्यामुळे येत्या २०२४ च्या निवडणुकीत यांना यांची जागा दाखवून द्या. उद्धव ठाकरेंची शिवसेना, चिन्ह एकनाथ शिंदेंना दिले, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि चिन्ह अजित पवारांना दिले. पण आज भाजपने त्यांची दयनीय अवस्था करून ठेवली आहे.
या जाहीर सभेत बोलताना डॉ. चौधरी म्हणाले की, साखरपा मार्गे येताना पाहिले तर आज अनेक ठिकाणी माळीणसारखी दुर्घटना घडू शकते असा विकृत विकास गडकरींनी केला आहे. कोकणचा पर्यावरणाचा -हास झाला आहे. हा -हास करणारे कोण आहेत. रामदास कदम यांनी पर्यावरण मंत्री असताना काय केले? तुमचे राजकीय वाद मतभेद हे तुमच्या पुरतेच ठेवा. त्याचा सूड राज्याच्या पर्यावरणावर काढणार असाल तर ते आम्हाला मान्य नाही. आज जे काही राजकारण चालले आहे, त्याकडे सतर्कतेने बघण्याची गरज आहे. अश्लाघ्य व्यक्तिवाद राजकारणात घुसवला जात आहे. आता ४०० चा नारा देत आहे. मात्र, यांना हद्दपार करायला हवं. लोकशाही एका माणसावर चालत नाही. एकामाणसावर चालते ती हुकूमशाही असते. त्यामुळे आम्हाला पक्ष, चिन्ह, उमेदवार महत्त्वाचे नसून नागरिकांची भूमिका महत्त्वाची आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचे उत्तर प्रदेशीकरण सुरू असल्याचा आरोप डॉ. चौधरी यांनी केला. प्रास्ताविक करताना संयोजक अभिजित हेगशेट्ये यांनी रत्नागिरीत या सभेची मागणी आग्रहपूर्वक केल्याचे सांगितले. ही सभा लोकांनी लोकांसाठी आयोजित केली असून, आज सगळीकडेच कोंडल्यासारखी परिस्थिती असल्याचे सांगितले.