(रत्नागिरी)
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. तसेच पक्षांतर करणाऱ्यांच्या संख्येतही वाढ झाली आहे. गुहागर मध्ये अजित दादा पवार गटात सक्रिय असलेले राजेश बेंडल यांनी दिनांक 22 ऑक्टोबर रोजी रत्नागिरी येथे पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत शिंदे शिवसेना गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण शिंदे गटात प्रवेश करत असल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राजेश बेंडल हे गुहागरमधून शिंदे गटातर्फे इच्छुक आहेत. गुहागर मतदारसंघातून भाजपतर्फे दावा केला जात आहे. हा मतदारसंघ पारंपरिकतेने शिंदे शिवसेनेचा आहे. त्यामुळे शिंदे शिवसेनेतून महायुतीच्या माध्यमातून उमेदवारी मिळाल्यास आपण सर्व घटक पक्षांच्या आणि आपल्या कुणबी समाज बांधवांच्या पाठिंबावर निश्चित विजयी होईन, असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. बेंडल यांचे शिंदे शिवसेनेत पालकमंत्री उदय सामंत यांनी स्वागत केले.