(मुंबई)
महायुती सरकारमध्ये पालकमंत्रीपदांवरून सुरू झालेल्या अंतर्गत संघर्षाने आता गंभीर वळण घेतले आहे. रायगड आणि नाशिक या दोन महत्त्वाच्या जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदांवरून शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्यात तणाव निर्माण झाला आहे. रायगडचा मुद्दा अधिक चिघळला असून, स्थानिक पातळीवर आंदोलनं आणि असंतोष उफाळून आला आहे.
राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे यांना रायगडच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, शिवसेनेचे भरत गोगावले यांचे समर्थक यावर आक्रमक झाले. त्यांनी आंदोलनं, रास्तारोको आणि पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे देण्यासारखे पावले उचलली, त्यामुळे सरकारला अवघ्या २४ तासांत रायगड आणि नाशिक पालकमंत्रीपदाला स्थगिती द्यावी लागली. यावर तोडगा काढण्यासाठी भाजपने शिवसेनेला नवा प्रस्ताव दिल्याची चर्चा आहे. रायगडच्या वादावर पडदा टाकण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्याकडे रायगडचे पालकमंत्रीपद देण्याचा विचार केला जात आहे. मात्र, याचा दुसरा परिणाम असा होऊ शकतो की मुंबईचे पालकमंत्रीपद शिंदेंकडून काढून ते भाजपकडे सोपवले जाईल.
भाजपकडून रायगड शिंदेंना देण्याचा पर्याय समोर ठेवला जात असला तरी त्याबदल्यात मुंबईचा पालकमंत्रीपद काढून घेण्याचा विचार आहे. त्यामुळे शिवसेनेच्या हातातून मुंबई गेल्यास शिंदे गट कमकुवत होऊ शकतो का? हा मोठा प्रश्न आहे. जर मुंबईचे पालकमंत्रीपद भाजपकडे गेले, तर याचा परिणाम आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीवर होऊ शकतो. शिवसेनेच्या हातून मुंबई गेली, अशी टीका विरोधकांकडून होऊ शकते आणि त्याचा फायदा राष्ट्रवादी-काँग्रेस व शिवसेना (उबाठा) घेतल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसाठी हा निर्णय घेताना मोठा धोका पत्करावा लागणार आहे. भाजपने शिंदेंना रायगड देऊन मुंबई हिसकावण्याचा डाव आखल्यास महायुतीच्या स्थिरतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते. आता रायगड पालकमंत्रीपदाचा तिढा मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे-पवार कसा सोडवतात यावर पुढची अनेक गणिते अवलंबून आहेत.