(रत्नागिरी)
शेतकऱ्यांच्या हिताचा आणि देशाच्या संरक्षणाचा प्रकल्प रत्नागिरी तालुक्यातील वाटद परिसरात होत आहे. जागेचे थेट पैसे रिलायन्स कंपनी आपल्याकडे पाठवणार आहे. त्यामुळे कमिशन एजंटच्या कुठल्याही गैरसमजाला बळी पडून आपल्या जमिनी विकू नयेत, असे आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी रविवारी केले आहे.
पालकमंत्री श्री सामंत यांनी म्हटले आहे, महाराष्ट्र सरकारच्यावतीने दोन दिवसांपूर्वी मंत्रिमंडळ बैठकीत रत्नागिरीत दोन प्रकल्पांची घोषणा करण्यात आलेली आहे. त्यातील एक प्रकल्प डिफेन्स क्लस्टर आहे. तो रत्नागिरी तालुक्यातील वाटद येथील परिसरात होणार आहे. कमिशन एजंट जागा खरेदी-विक्रीचे व्यवहार करीत असतील तर, तिथल्या शेतकऱ्यांनी दक्षता घ्यावी. कुठल्याही शेतकऱ्यांनी स्वतःची जागा विकू नये. जागेचे थेट पैसे रिलायन्स कंपनी आपल्याकडे थेट पाठवणार आहे.
कुठल्याही गैरसमजाला शेतकऱ्यांनी बळी पडू नये. शेतकऱ्यांच्या हिताचा आणि देशाच्या संरक्षणाचा प्रकल्प या परिसरात येतोय. शेतकऱ्यांना विश्वासात घेवूनच हा प्रकल्प केला जाईल. शेतकऱ्यांचे कुठल्याही प्रकारचे नुकसान महाराष्ट्र शासन, उद्योग विभाग व्हायला देणार नाही, असेही पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले.