(माणगाव)
पुणे-दिघी महामार्गावर रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाटात लग्नाला निघालेल्या वऱ्हाडावर काळाने घाला घातला आहे. कोंडेथर गावच्या हद्दीत बस उलटून भीषण अपघात झाला. आज शुक्रवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. या भीषण अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला असून ४० जण जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील लोहगाव येथून जाधव कुटुंब हे महाड येथील बिरवाडी येथे बसमधून लग्न समारंभासाठी खासगी बसने जात होते. खासगी बस जात असताना ताम्हिणी घाटात वॉटरफॉल पॉईंटजवळ धोकादायक वळणावर बस ड्रायव्हरचे नियंत्रण सुटले आणि भीषण अपघात झाला. ही गाडी पूर्णपणे पलटी झाली आणि पाच जणांचा मृत्यू झाला, तर ४० प्रवाशी जखमी झाले आहेत. यातील १२ ते १३ प्रवाशांची प्रकृती गंभीर आहे. या घटनेची माहिती मिळताच माणगाव पोलीस तातडीने घटनास्थळी रवाना झालं. मृतांना बाहेर काढण्यात आलं असून जखमींवर उपचार सुरू आहेत. या अपघाताप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
मृतांची नावे
मृतांमध्ये ३ महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. संगिता धनंजय जाधव, गौरव अशोक दराडे, शिल्पा प्रदीप पवार, वंदना जाधव अशी मृतांची नावे असून, एका मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही.