(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे मानेवाडी येथील श्री चंडिका मित्रमंडळाच्या वतीने सहाव्या पर्वातील गणपतीपुळे प्रीमियर लीग नाईट अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन दिनांक १० फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी या कालावधीत करण्यात आले आहे.
गणपतीपुळे मानेवाडी स्टॉप नवी विहीर येथील जीपीएल मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेचे उद्घाटन स्पर्धेचे मंगळवारी 10 फेब्रुवारी रोजी रात्री जयगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. तसेच या स्पर्धेच्या भव्य दिव्य चषकाचे अनावरण ही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर क्रीडा पिठावर ठेवण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी त्यांचे समवेत गणपतीपुळे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संदीप साळवी, गणपतीपुळेचे माजी सरपंच बाबाराव माने, ज्येष्ठ नागरिक अरुण काळोखे, गणपती मंदिराचे मुख्य पुजारी अमित घनवटकर, ग्रामपंचायत सदस्य संजय माने, पर्यटन व्यावसायिक परेश कुबडे,उमेश भन्सारी, कल्पेश सुर्वे, पत्रकार वैभव पवार, संदीप खानविलकर, किशोर गुरव, अशोक माने, जयवंत आग्रे, संदीप रहाटे आदिंसह गणपतीपुळे मानेवाडी येथील प्रतिष्ठित ग्रामस्थ, श्री चंडिका मित्र मंडळाचे सदस्य व विविध मान्यवर उपस्थित होते. ही स्पर्धा चार ग्रुपमध्ये होणार असून एकूण बारा संघ सहभागी झाले आहेत.
या स्पर्धेसाठी आकर्षक व सुसज्ज दर्जाचे मैदान बनवण्यात आल्याने तसेच अत्यंत नेटके नियोजन श्री चंडिका मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आल्याने उपस्थित जयगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील व उपस्थित मान्यवरांनी या स्पर्धेचे प्रमुख संयोजक संकेत उर्फ पिंट्या गावणकर यांचे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे विशेष कौतुक केले.
गेली पाच वर्षे या स्पर्धेचेअत्यंत दिमाखदार नियोजन केले जात असून आयपीएलच्या धर्तीवर ही स्पर्धा लिलाव पद्धतीने खेळवली जात असल्याने या स्पर्धेतील दर्जेदार खेळाडूंचा खेळ क्रिकेट प्रेमींना पाहायला मिळतो. त्यामुळे यंदाही गणपतीपुळे प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये दर्जेदार खेळाडू सहभागी झाल्याने ही स्पर्धा खास आकर्षण मानली जात आहे. एकूणच पाच दिवसीय कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेतील प्रेक्षणीय सामने पाहण्यासाठी संपूर्ण गणपतीपुळे पंचक्रोशीतील व रत्नागिरी तालुक्यातील क्रिकेटप्रेमींची उपस्थिती लाभणार आहे.