( रत्नागिरी / प्रतिनिधी )
अनुसूचित जातीच्या मुला -मुलींना परदेशात विशेष अध्ययने करण्यासाठी राजश्री शाहू महाराज योजनेतील जाचक अटी-शर्ती लागू केल्या आहेत. याबाबत राज्यभर सम्यक विद्यार्थी आंदोलन संघटनेने विरोध दर्शवला असून यासंदर्भात शुक्रवारी (दिनांक १४ जून २०२४) प्रत्येक जिल्ह्यातून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन सादर केले आहे.
या निवेदनात सम्यक विद्यार्थ्या आंदोलनाच्या वतीने प्रमुख मागण्या व सूचना करण्यात आलेल्या आहेत. मुलांवर लादण्यात आलेल्या जाचक अटींमुळे अनुसूचित जातीमधील अनेक विद्यार्थी वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. संघटनेचे पदाधिकारी, विद्यार्थी यांनी महसूल तहसीलदार तेजस्विनी जाधव यांना निवेदन सादर केले. निवेदनात म्हटले आहे की, परदेश शिक्षण शिष्यवृत्तीच्या जाचक अटी शिथिल करण्यात याव्यात जसे की, उत्पन्न मर्यादा ही वार्षिक 16 लाख रुपये पर्यंत व वयाची अट किमान 45 वर्षे पर्यंत वाढवण्यात यावी, परदेशी शिष्यवृत्ती साठी येणाऱ्या विद्यार्थी अर्जाची मर्यादा 75 वरून 150 पर्यंत करावी.
तसेच Graduation साठी 75 जागांचे नियोजन हे नवीन शैक्षणिक वर्षासाठी करून त्या योजनेला ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले परदेशी पदवी योजना’ हे नाव देण्यात यावे व ही नियोजित योजना (A+, B+ अजून जे बोर्ड शासन मान्य असतील ते) सर्व बोर्डाच्या जागांसाठी लागू करून, त्या जागा विद्यार्थ्यांसाठी खुल्या कराव्यात, 80% गुणांची अट रद्द करून ती कमीत कमी 60% करावी, कारण ग्रामीण भागातील विद्यार्थी ऊस तोडून, शेत मजुरीचे काम, कष्ट करून शिक्षण घेत असतात त्यांना कमी मार्क असतात. 80% ची अट रद्द करून ती किमान 60% न केल्यास आपण ग्रामीण भागातील, शेत मजुरांच्या मुलांच्या प्रवेशाची जागा जास्त शहरी मुलांना मिळेल, म्हणजे शासन असंवेदनशील आहे, ग्रामीण मजुरांच्या मुलांवर जाणीवपूर्वक अन्याय करतंय? व शहरी, अधिकारी यांच्या मुलांना प्राधान्य देतंय असे सिद्ध होईल. त्यामुळे मार्क्सची मर्यादा कमीत कमी 60% करावी. यासोबत जागतिक विद्यापीठे, कॉलेजेस यांची आपण घातलेली 200 व्या रैंक ची मर्यादा 300 रैंक असलेल्या सर्व विद्यापिठे, कॉलेजेस अर्ज भरण्यासाठी वाढवून आपल्या यादीत समाविष्ट करावीत. म्हणजे विद्यार्थ्यांना अधिक संधी उपलब्ध होतील. अशा एकूण संघटनेच्या वतीने दहा मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सादर करण्यात आले आहे.
निवेदन सादर करताना वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष चंद्रमणी सावंत,जिल्हा उपाध्यक्ष तेजस्विनी बेटकर , जिल्हा सचिव अमर पवार, जिल्हा सदस्या प्रांजली कांबळे तसेच श्रद्धा पवार, राखी मोहिते, आयुष मोगरे, साहिल पवार, प्रणित कांबळे , वृषाली पालकर, अनिकेत सावंत, विनया गमरे, संघरत्न सावंत , निशांत जाधव, दर्शना निवळकर , अथर्व पवार , आर्यन सावंत , आर्यन मोगरे .आदी कार्यकर्ते उपस्थित होते.