स्वातंत्र्यपर्व काळात १९३५ साली जन्मलेले. पारतंत्र्याचे चटके सहन करत इ. ७ वी पर्यंत शिक्षण घेतलेले दादा जाधव यांनी शिक्षक म्हणून नोकरी स्वीकारली आणि तिही अतिशय आवडीने. मळलेल्या वाटेने अनेक जण चालत असतात. पण शिक्षण क्षेत्रात आपण नवीन काहीतरी करून दाखवावे, देशप्रेम आणि समाजप्रबोधन हे महत्त्वाचे अंग मानून गोपिनाथ उर्फ दादा जाधव गुरुजी यांनी जुन्या काळात विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास साधण्यासाठी अनेक कृती उपक्रम राबवून शिक्षण क्षेत्रात एक नवा आदर्श निर्माण केला म्हणूनच गोपीनाथ जाधव गुरुजींचे नाव आजही तितक्याच आदराने घेतले जाते.
रत्नागिरी जिल्ह्यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सर्व प्रथम पालक शिक्षक संघ रजिस्टर करून नेत्रदीपक असा शैक्षणिक उठाव पालक व ग्रामस्थांच्या साथीने केला. दादांनी ,आपल्या स्वकर्तबगारीने रत्नागिरी जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळविला, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपक्रम राबविल्याने त्यांना त्यावेळी आदर्श मुख्याध्यापक म्हणून सन्मानित करण्यात आले होते. सडामिऱ्या बौद्धजन पंचायत समितीचे निष्ठेने अध्यक्षपदाची यशस्वी धुरा त्यांनी सांभाळली. जुन्या काळात समाजभान राखून विज्ञानाचा त्यांनी अंगिकार केला, मोठ्या हिमतीने ,दूरदृष्टीने, त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केले. शिक्षण आणि समाजिक क्षेत्रात त्यांनी आवडीने काम करून समाज संघटन केले. समाजाला संघटनेचे महत्त्व पटवून दिले. विद्यार्थ्यांबरोबर तरूण पिढीला ते सातत्याने मार्गदर्शन करत. कोणत्याही कामाचे नियोजन करून कार्यवाही करण्यात ते नेहमीच दक्ष असत. शब्दाला ते पक्के होते. दादांच्या निधनाने सर्वांनाच ओठी आपल्या कुटुंबातीलच व्यक्ती हरपल्याच्या भावना सहज उमटल्या..
रत्नागिरी जिल्ह्यातील प्राथमिक शाळेत पहिला पालक शिक्षक संघ रजिस्टर करण्याचे काम त्यांनी केले. एवढेच नव्हे तर या पालक संघाच्या माध्यमातून ग्रामस्थांच्या आर्थिक सहकार्याने त्यांनी रत्नागिरी तालुक्यातील चाफे नं.१ शाळेच्या दोन स्लॅबच्या वर्ग खोल्या उभ्या करून जिल्ह्यात वैशिष्ट्यपूर्ण आदर्श निर्माण केला. दिवंगत गोपिनाथ काशिनाथ जाधव हे जुन्या काळातील हाडाचे शिक्षक होते, कडक शिस्तीचे, स्पष्ट वक्ते, प्रामाणिक, मनमिळावू व्यक्तिमत्त्व म्हणून ते परिचित होते.
गोपीनाथ जाधव गुरुजी यांनी आपल्या शैक्षणिक कालखंडात अनेक आदर्श विद्यार्थी घडवले. बौद्धाचार्य भूमिकेतून समाज प्रबोधनाचेही त्यांनी प्रशंसनीय आणि उल्लेखनीय कार्य केले. कोणत्याही समाजातील गरजवंताला त्यांनी सढळहस्ते मदतीचा हात दिला.रत्नागिरी, गुहागर, राजापूर या तालुक्यात शैक्षणिक बाबतीत त्यांनी आपल्या कामाची विशेष चमक दाखवली. जुनी इ. ७ वी शिकलेले गोपिनाथ जाधव गुरुजींनी सुमारे ४० वर्षांपेक्षा जास्त शिक्षण क्षेत्राला आपलेसे मानून स्वतःला झोकून देऊन काम केले. दिवंगत गोपीनाथ जाधव यांच्या पत्नी वैजयंती गोपिनाथ जाधव यांनीही शिक्षिका म्हणून आदर्शवत कामगिरी केली आहे.
गोपिनाथ जाधव यांचा मुलगा प्रशांत जाधव हे पदवीधर शिक्षक असून त्यांचेही शैक्षणिक, सामाजिक, कला, क्रीडा व धार्मिक क्षेत्रात अतिशय चांगले योगदान मिळत आहे. दादांचा नातू कॅप्टन साहिल जाधव याने जिद्दीने पायलट प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर दादांनी आपल्या नातूवर अभिनंदनाचा वर्षाव करून भरभरून आशीर्वाद दिले. दादांचे कुटुंबीय उच्चशिक्षित आहे.
आपल्या एकत्र कुटुंबाला दादांनी मोठा आधार दिला. अडल्या नडल्या गरजूंसाठी त्यांनी आपला हात कधीच आखडता घेतला नाही. जमेल तशी मदत देण्यात त्यांनी धन्यता मानली.
शिक्षक म्हणून काम करताना ज्या गावात ते वास्तवास असत त्या गावी सामाजिक न्याय निवाडा करणे आणि गरीबांना शाब्दिक तसेच आर्थिक मदत देण्याचे काम त्यांनी केले .विद्यार्थीदशेपासून ते आजतागायत त्यांनी माणुसकीची नाती जपली.सामाजिक बांधिलकीतून अनेक सामाजिक, धार्मिक संस्थांना त्यांनी मदत देऊ केली. शिक्षण घेऊन आपले कुटुंब चांगले सांभाळा , व्यसनांपासून अलिप्त रहा ,असा ते तरूणांना आवर्जून सल्ला देत. नोकरी धंदा करणाऱ्या , तसेच सामाजिक, धार्मिक काम करणाऱ्या तरूणांबद्दल ते आदर व्यक्त करत.
दिवंगत गोपिनाथ जाधव हे सेवानिवृत्ती नंतर सामाजिक व धार्मिक कार्यात हिरीरीने सहभागी होत. धाडस आणि करारीपणा हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू होते.उतार वयात दादांची त्यांच्या कुटुंबियांनी उत्तम सेवा केली. दादांच्या निधनाबद्दल अनेक जाणकारांनी शोक व्यक्त केला.त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सूना, मुलगी, जावई,नातवंडे, बहिण, पुतणे असा मोठा परिवार आहे. गोपिनाथ जाधव गुरुजी यांच्यावर १० नोव्हेंबर रोजी सडामिऱ्या येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्ययात्रेत प्राथमिक शिक्षकांच्या अनेक संघटना,सामाजिक ,राजकीय, सांस्कृतिक, कलाक्षेत्रातील अनेक नामवंत मान्यवर, समाजबांधव, नातेवाईक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्याचा जलदान विधी रविवारी १७ नोव्हेंबर रोजी सडामिऱ्या आनंदनगर येथील निवासस्थानी होणार आहे.शिक्षण क्षेत्रातील एक जाणकार व्यक्तिमत्त्व हरपले असल्याच्या भावना अनेकांनी व्यक्त केल्या. दिवंगत गोपिनाथ उर्फ दादा जाधव गुरुजी आज देहरुपाने आपल्यात नसले ,तरी त्यांचे कार्य आपणां सर्वांना कायम प्रेरणा देत राहील….!!!
– संतोष पवार, जाकादेवी, रत्नागिरी
९४२३०४९९८३