(चिपळूण)
मुंबई-गोवा महामार्गावरील पॉवर हाऊसनजीक एक घर रस्त्याच्या कडेला साचलेल्या पाण्याने वेढले गेले आहे. या ठिकाणी चौपदरीकरण करणाऱ्या ठेकेदाराने पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य व्यवस्था न केल्याने येथील कुटुंबाची कुचंबणा झाली आहे. अखेर या त्रासाला कंटाळून या ठिकाणी ‘येथे उत्तम प्रतीचे साथीच्या रोगाचे डास मिळतील’ असा उपरोधिक फलक लावला आहे.
चिपळुणात चौपदरीकरणाच्या कामामुळे ठिकठिकाणी पावसाचे पाणी तुंबून नागरिकांची गैरसोय होत आहे. चौपदरीकरण केलेला रस्ता आणि उंच झालेले गटार याचा ताळमेळ नसल्याने अनेक ठिकाणी ही समस्या निर्माण झाली आहे. या शिवाय मोऱ्यांचा देखील प्रश्न आहे. शहरातील डीबीजे महाविद्यालय, परशुराम नगर, पागनाका आदी भागात अशीच समस्या निर्माण झाली आहे. शहरातील पॉवर हाऊसनजीक पाग रस्त्याला जोडणाऱ्या गल्लीजवळ ही समस्या निर्माण झाली आहे. या ठिकाणी असलेले आंब्रे यांचे घर तुंबलेल्या पाण्याने वेढले गेले आहे. पाण्याचा निचरा होत नसल्याने या ठिकाणी डासांची पैदास होत आहे.
अखेर राष्ट्रीय महामार्ग विभागाचे लक्ष वेधण्यासाठी या ठिकाणी असा फलक लावण्यात आला आहे. आता तरी याची दखल संबंधित राष्ट्रीय महामार्ग विभाग व ठेकेदार घेईल का? याची प्रतीक्षा आहे.