(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर तालुक्यातील सांगवे मुख्य रस्त्यावर काल रविवारी घोयरा सरडा अर्थातच शॅमेलीऑन पाहायला मिळाला. बुरंबी येथील प्रतिष्ठित व्यापारी तसेच सामाजिक कर्यकर्ते असलेले नरेश उर्फ राजू जागुष्टे यांना सांगवे येथे जात असताना मुख्य रस्त्यावर अगदी संथगतीने डायनासोर सारखा दिसणारा मात्र सरड्याचा आकाराचा प्राणी दिसल्याने त्यांनी आपली दुचाकी थांबवत शॅमेलिऑन चे फोटो स्वतःच्या मोबाईलमध्ये कैद केले.
वेगात पळता येण्याची क्षमता नसल्याने, संथ गतीने जात असलेला हा सरडा एखाद्या वाहनाखाली सापडू नये म्हणुन नरेश जागुष्टे यांनी त्याला उचलून रस्त्यालगत असलेल्या हिरवळीत सोडले. मात्र हे करण्यापूर्वी डायनासोर सारख्या दिसणाऱ्या दुर्मिळ हिरव्या रंगाच्या त्या शॅमेलिऑन चे फोटो आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद करण्यास मात्र विसरले नाही.
आपल्या परिसरात तसेच रानावनात, झाडाझुडपात सहजपणे दिसून येणाऱ्या सरड्यांच्या वर्गात मोडणारा दुर्मिळ असा हा घोयरा सरडा आहे. अख्ख्या भारतात घोयरा सरड्याची फ़क्त एकच जात मिळते, ती सुद्धा मुख्यत्वे दक्षिणेकडेच ! घोयरा सरड्याचं वेगळेपणं अगदी त्याच्या दिसण्यापासुनच सुरु होतं.
खडबडीत दिसणारं ह्याचं शरीर दोन्ही बगलांकडून अगदी दाबून चपटं केल्यासारखं दिसतं. एकावर एक तीन शिरस्त्राणं घातल्यासारखं दिसणारं याच डोकं, कडबोळ्यासारखी वळलेली शेपूट, शरीराला न शोभणारे लुकडे पाय नी “ज्युरासिक पार्क” पिक्चर मधल्या डायनोसॉर ची आठवण करुन देणारा याचा जबडा असं ‘सुंदर ते ध्यान, राहे फ़क्त झाडावरीच’! याचा कारण म्हणजे घोयरा क्वचीतच जमिनीवर उतरतो. अगदी तहान लागली तरीही घोयरा झाडाच्या पानांवर पडलेले दवबिंदुच पितो. शक्यतो जमिनीवर न उतरणाऱ्या ह्या सरड्याची मादी अंडी घालण्यासाठी जमिनीवर उतरते नी चक्क बिळ खोदुन त्यात अंडी घालते.
आपण नेहेमी पहातो की आपल्या समोर दिसणारे सरडे अगदी तुरुतूरू पळत असतात. पण ह्याच्या अगदी विरुद्ध गोष्ट घोयरा करतो. हा सरडा कधीच वेगाने धावत नाही. अगदी संशय घेत, चाहुल घेत विचार करुन हा सरडा प्रत्येक पाउल टाकतो. जमिनीवर जी गोष्ट, तीच गोष्ट झाडावरपण. अगदी कसरतपणे हा लवचीक फ़ांद्यांवरही मस्त हालचाली करतो. ह्या हालचाली पाहिल्यावर एक गोष्ट ठळकपणे जाणवते नी ती म्हणजे याचं स्वतःच्या शरीरातल्या प्रत्येक स्नायुवर कमालीचा ताबा असतो.
बरेचदा आपण जंगलात याला कित्येक तास एकाच ठिकाणी बसलेलं पाहू शकतो. जे चपळपणे धावु शकत नाही ते स्वतःच वेगाने धावणारं भक्ष कसं पकडणार असा एक बेसिक प्रश्न कुणाच्याही मनात लगेच येऊ शकतो. निसर्गाने त्याच्या प्रत्येक अपत्यासाठी काहीनाकाही तजवीज करुन ठेवलेली असते. घोयऱ्याची जिभ म्हणजे निसर्गातलं एक आश्चर्यच! त्याची जिभ त्याचे एकमेव अस्त्र आहे. या जिभेच्या जोडीला याचे डोळे निसर्गातलं दुसरं वैशिष्ट असतात. घोयऱ्याचे डोळे तेल भरायच्या कोन नरसाळ्याप्रमाणे एका शंकुच्या टोकावर बसवलेले असतात. हे डोळ्याचे दोन्ही शंकु स्वतंत्रपणे वेगवेगळ्या दिशांना फ़िरु शकतात. म्हणजे ह्याच भक्ष नजरेस पडलं की हा त्याचा अंदाज घेतो, सावकाश शरीर पुढच्या पायावर तोलुन हळुच जबडा उघडुन थोडीशी जिभ पुढे काढुन तयार असतो. हे सगळं अगदी स्लो मोशन मध्ये सुरु असतं. मात्र नंतर एकाएकी आपल्यालाच काय, त्या भक्षाला पण कळत नाही की भक्षाची जागा घोयऱ्याच्या तोंडात कशी? याची आठ ते नऊ ईंच लांब गुलाबीसर जिभ आपल्या चिकट टोकाने भक्षाला खेचुन घेते. हेच ते घोयरा सरड्याच जगप्रसिद्ध जिभ फ़ेकणं नी परत आत घेणं! याच पद्धतीने हे महाराज मस्तपैकी किडे मकोडे, भुंगे, फुलपाखरं, मोठे कीटक मटकावून घेतो.