(खेड)
तालुक्यातील खोपी-रघुवीर फाटा नजीक येथील पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने गजाआड केलेल्या एका महिलेसह तिघांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता तिघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. गांजा प्रकरणातील दोन स्थानिक संशयितांचाही पोलिसांकडून शोध जारी आहे. गांजा वाहतूक प्रकरणी लक्ष्मण कुंदन भोरे (४०), उज्ज्वला बाळकृष्ण मेकले (३६), अविनाश हरिश्चंद्र मोरे (४५, उंचाट-महाबळेश्वर) या अटकेतील तिघांना दुसऱ्यांदा सुनावण्यात आलेल्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते.
न्यायालयाने तिघांनाही न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे. यामुळे गांजा प्रकरणाचे नेमके कनेक्शन शोधून काढण्यासाठी येथील पोलिसांना तपासाकरिता पुरेसा अवधीही मिळाला आहे. या प्रकरणात येथील दोन स्थानिक संशयितांचाही सहभाग असल्याचे तपासात समोर आल्यापासून दोघेही संशयित येथून पसार झाले आहेत. पोलिसांचे पथक दोघांच्याही मागावर असून त्यांचा सुगावा देखील लागला आहे. दोघांच्या अटकेनंतर गांजा खरेदी-विक्री प्रकरणाच्या नेमक्या ‘कनेक्शन’चा उलगडा होणार असून सहभाग असणाऱ्या आणखी काही संशयितांची नावे समोर येण्याची शक्यता आहे.