(नाणीज)
येथील जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानतर्फे उद्या (3 मार्च 2024) संतशिरोमणी गजानन महाराज प्रगट दिनी व आद्य जगद्गुरू रामानंदाचार्य महाराज जयंती दिनी भव्य व नेत्रदीपक शोभायात्रा काढण्यात येणार आहे. यामध्ये महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचे दर्शन घडेल. दरम्यान आज वारी उत्सवास सुरूवात झाली. याग व निमंत्रण मिरवणुकांनी सारा सुंदरगड भक्तीमय झाला आहे.
आज या सोहळ्याची सुरुवात मंत्रघोषाणे झाली. सारे वातावरण भक्तीमय झाले. सारा सुंदरगड भाविकांनी फुलून गेला आहे. उद्या त्यात आणखी भर पडेल. आज धार्मिक विधींबरोबर श्री महामृत्युंजय सप्तचरजीवी याग व अन्नदान विधी सुरू होईल. त्यानंतर दुपारी ढोल-ताशांच्या गजरात, जयघोष करीत मिरवणुकीने जाऊन देवदेवतांना सोहळ्याची निमंत्रणे देण्यात येणार आहेत. येथील श्री वरद चतामणी, प्रभू श्री राम, लक्ष्मण, सीता मंदिर, मुख्य श्री गजानन महाराज मंदिर, नाथांचे माहेर मंदिर येथे या मिरवणुका काढून निमंत्रणे दिली. या मिरवणुकांची जबाबदारी रत्नागिरी, धाराशिव, जालना, नागपूर जिल्हा समित्यांवर होती.
उद्या सकाळी नऊपासून संतशिरोमणी गजानन महाराज व आद्य जगद्गुरू रामानंदाचार्य महाराज यांची शोभायात्रा निघणार आहे. या शोभायात्रेत महाराष्ट्रातील खेड्यांत पिढ्यापिढ्या सुरू असलेल्या लोकसंस्कृतीचे दर्शन घडणार आहे. अनेक लोककला यामध्ये सादर केल्या जाणार आहेत. ऐतिहासिक, पौराणिक सजीव देखावे, जनजागृती करणारी पोस्टर्स, नाथांचे माहेर (जुनामठ) ते सुंदरगड मार्गावर निघणाऱ्या या शोभायात्रेत महाराष्ट्राराष्ट्रातील लोकसंस्कृतीचे दर्शन घडवले जाणार आहे. भाविकांचे आकर्षण असलेल्या या शोभायात्रेत अनेक धार्मिक, पौराणिक सजीव देखावे, चित्ररथ असतील. यावेळी अनेक लोककला व वाद्यांचे सादरीकरण होईल. त्यामध्ये स्वतः जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज, प.पू. कानिफनाथ महाराज यांचे रथ असतील. देशभरातून आलेल्या साधूसंतांचे रथही सहभागी होतील.
दुपारनंतर ॲम्बुलन्स सेवेत चांगले कार्य केलेल्यांचा सत्कार करण्यात येईल. गेल्याच आठवड्यात महाराष्ट्रासह अन्य राज्यांतील 900 केंद्रांवर महारक्तदान शिबिरे झाली. त्यात विक्रमी 81 हजारावर कुपिका रक्तसंकलन झाले. त्यात चांगले कार्य केलेल्या व्यक्तीचा व पीठांचा सत्कार होणार आहेत. रात्री सर्वांचे आकर्षण असलेल्या प.पू. कानिफनाथ महाराज व जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांची प्रवचने होतील. देवाला साकडे घालून सोहळ्याची सांगता होईल.
दरम्यान सोहळ्यासाठी सुंदरगड, नाथांचे माहेर येथे भाविक मोठ्या संख्येने दाखल झाले आहे. उन्हाचा काडाका आहे. त्याची तमा न बाळगता भाविक या सोहळ्यत सहभागी झाले आहेत. त्यांच्यासाठी पाणी, प्रसादाची सुविधा चोख ठेवण्यात आली आहे. उद्या सोहळ्याच्या मुख्य दिवशी ही गर्दी आणखी वाढणार आहे.
फोटो-
1) नाणीजक्षेत्री सुंदरगडावर शनिवारी सुरू झालेला याग.
2) नाणीजक्षेत्री सुंदरगडावर शनिवारी देवदेवतांना निमंत्रण देण्यासाठी काढण्यात आलेल्या मिरवणुका.