(संगमेश्वर)
तालुक्यातील देवरुखनजीकच्या ओझरे गावातील दादा जागुष्टे यांच्या घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये बिबट्या कैद झाला आहे. त्यामुळे या भागात बिबट्याचा मुक्तसंचार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून बिबट्याचा या भागात मुक्तसंचार सुरू आहे. रात्री-अपरात्री कामावरून किंवा बाहेर गावाहून परतणाऱ्या ग्रामस्थांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. या संदर्भात वनविभागाला अनेक वेळा कळविण्यात आले. मात्र, वनविभागाने याकडे गांभीर्याने पाहिलेले नाही.
दोन दिवसांपूर्वी ओझरे येथील दादा जागुष्टे यांच्या घराच्या परिसरात असलेल्या कॅमेऱ्यात बिबट्या वावरताना दिसला आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत.