(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी- गणपतीपुळे मुख्य मार्गावरील तरवळ स्टॉपजवळ असलेल्या झणझणीत शितूत मिसळ हॉटेलमध्ये लहान मुलांना मोफत दूध आणि मोफत मम्मम सेवा सुरू करण्यात आली आहे. या हॉटेलमध्ये आलेल्या प्रत्येक ग्राहकाने एखादी खाण्याची ऑर्डर दिली किंवा नाही दिली तरी देखील लहान मुलांना एक ग्लास मोफत दूध दिले जाते. सन 2022 च्या देव दिवाळीपासून ही नवीन मम्मम सेवा मोफत सुरू करण्यात आली आहे. या मम्मम सेवेमध्ये मऊ भात, साजूक तुपातील रवा पेज, भरडी इत्यादी सर्व देण्यात येते आणि सर्व फ्रेश स्वरूपात दिले जाते. त्याचबरोबर लहान मुलांना संबंधित पदार्थ देण्यापूर्वी स्वतः या हॉटेलचे मालक हृषिकेश शितूत हे खात्री करूनच देतात. त्यामुळे अजिबात काळजी करण्याची गरज नसते. तसेच लहान बाळांच्या पातेल्या, भांडी आणि सर्व साहित्य वेगळे ठेवण्यात येते.
जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ आणि प्रसिध्द तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथे येताना किंवा या रस्त्यावर प्रवास करताना जर एखाद्याच्या गाडीत लहान बाळ असेल आणि त्यांनी जर शितूत परिवाराला आघाऊ फोन करून कळवून ठेवले की, आमच्या गाडीत लहान बाळ आहे तर तात्काळ शितूत परिवाराकडून गरम किंवा कोमट प्रत्येकाला हवी तशी दुधाची बॉटल त्या गाडीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न शितूत परिवाराकडून केला जातो. परंतु यासाठी कोणतेही चार्जेस ही घेतले जात नाहीत. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने ही सेवा गेल्या तीन वर्षापासून हॉटेल पहिल्यांदाच चालू केल्यापासून सुरू करण्यात आली होती. या हॉटेलला सोमवारी सुट्टी असते. परंतु लहान बाळांसाठी मोफत दूध सेवा व मोफत मम्मम सेवा सुरू ठेवण्यात आली आहे. तसेच हॉटेलपाशी आल्यानंतर किंवा येण्याआधी जर एखादा फोन किंवा मेसेज केला तरीही दुधाची व मम्मम सेवेची सोय नक्की करून दिली जाते. परंतु कोणत्या प्रकारचे चार्जेस घेतले जात नाहीत.
याशिवाय महत्त्वाचे म्हणजे 0 ते 120 ह्या कोणत्याही वयोगटातील मतिमंद( दिव्यांग) व्यक्तींसाठी व कोणत्याही वयातील कॅन्सर झालेल्या( कॅन्सर पेशंटसाठी ) (स्त्री /पुरुष / अन्य ) शितूत मिसळ पूर्णपणे मोफत आहे. त्यांच्याकडून कोणतीही चार्जेस घेतले जात नाहीत. एखाद्या प्रवासाला सहकुटुंब निघताना प्रवासामध्ये कित्येक छोट्या बाळांना दुधाची आवश्यकता असते. यावेळी या प्रवासामध्ये बाकी सर्व पदार्थ रस्त्यावर मार्गावर मिळू शकतात पण छोट्या मुलांना आवश्यक असलेले पदार्थ मिळतीलच असे नाही. आणि छोट्या मुलांची हीच छोटी इच्छा पूर्ण होऊ शकत नाही आणि म्हणून त्याच उद्देशाने शितूत परिवाराने मोफत दुधाची सोय आणि मोफत मम्मम सेवा सुरू करण्याचा उपक्रम राबविला आहे.
गणपतीपुळे ते रत्नागिरी मुख्य या मार्गावरून प्रवास करणाऱ्या छोट्या छोट्या लहान बाळांच्या मातांसाठी गणपतीपुळे येथे जाताना किंवा येताना तरवळ या मुख्य रस्त्यावर हे शितूत झणझणीत मिसळ हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये मोठ्या आत्मीयतेने आणि ममतेने छोट्या बाळांची काळजी घेतली जाते तसेच खास त्यांच्या दुधाची सोय व मम्मम खाऊची सोय करण्यात येते. छोट्या छोट्या मुलांवर माया करण्याचा त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि हास्य पाहण्याचा स्वार्थ शितूत परिवाराकडून केला जात आहे. या सेवेसाठी ते सदैव तयार असतात.तसेच 24 तास ही सेवा सुरू असते. स्वामी सेवेच्या या किचनच्या या दरवाज्याला कधीही कुलूप असत नाही हे किचन कायम उघडे असते. शंभर टक्के हक्काने या, कारण मी तुमच्याच बाळाचा एक छोटासा सेवेकरी आहे असे येथील हॉटेलचे मालक हृषिकेश शितूत यांनी म्हटले आहे.
एकूणच हृषिकेश शितूत परिवाराची ही सेवा सध्या लोकोपयोगी सेवा म्हणून ओळखली जात असून हा अत्यंत स्तुत्य उपक्रम ठरला आहे.आत्तापर्यंत 550 बाळांनी या मोफत सेवेचा लाभ घेतला आहे. सोशल मीडियावरील विविध माध्यमांकडून आणि आणि प्रतिष्ठित व जाणकार मंडळींनी या स्तुत्य उपक्रमाचे खास कौतुक केले आहे. तसेच विशेष म्हणजे आपल्या देशातील आणि विदेशातील नागरिकांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले असून, लवकरच विविध ठिकाणी या हॉटेलचे मालक हृषिकेश शितूत यांना विशेष सत्कारासाठी बोलिवण्यात आले आहे. या स्तुत्य उपक्रमाची ऑडिओ क्लिप देखील प्रसारित झाली आहे. या ऑडिओ क्लिपला रत्नागिरी(पावस) येथील व्हॉईस आर्टिस्ट कु.स्मितल बाबासाहेब माने हिने आवाज दिला आहे. एकूणच, या स्तुत्य उपक्रमाच्या अधिक माहितीसाठी हॉटेलचे मालक हृषिकेश शितूत यांच्याशी भ्रमणध्वनी क्रमांक 9421143890 यावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.