(रत्नागिरी)
सदनिका खरेदी व्यवहारप्रकरणी हातखंबा येथील स्टोन क्रशर व्यावसायिक शेखर शांताराम म्हाप यांची फसवून झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथील एका महिलेवर या प्रकरणी २३ लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी १६ जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अश्विनी महेश ओझा असे (ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) महिलेचे नाव आहे.
चिपळूण तालुक्यातील वहाळ फाटा येथील आगवे गावात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत सदनिका खरेदी करण्याबाबत शेखर म्हाप आणि अश्विनी ओझा यांच्यात सप्टेंबर २०२१ मध्ये बोलणी झाली. १ एप्रिल २०२४ रोजी म्हाप यांनी प्रत्यक्ष बांधकाम सुरू झाल्यानंतर सदनिकांची पाहणी केली आणि यातील तीन सदनिका ४० लाख रुपयांना विकत घेण्याचा व्यवहार ठरला. २० सप्टेंबर २०२१ रोजी म्हाप यांनी आपल्या कंपनीच्या नावावरील खात्यातून २० लाख ५० हजार रुपये आरटीजीएसद्वारे या महिलेच्या पुणे येथील बँक खात्यावर जमा केले. तसेच मुलगा सुमित याच्या खेडशी येथील खात्यातून २ लाख ५० हजार एवढी रक्कम पुन्हा या महिलेच्या नावावर जमा केली.
मात्र, वर्ष उलटून गेले तरीही अश्विनी ओझा हिने साठेखत तसेच खरेदीखत करून देण्यास टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. याबाबत तिला म्हाप यांनी विचारले असता, आपल्या भागीदाराला सांगून नोंदणीकृत दस्तऐवज करून देते, असे सांगितले. प्रत्यक्षात या तीनही सदनिकांची दुसरीकडे विक्री करण्यात आली. मात्र, आपले पैसे आतापर्यंत परत न दिल्याने म्हाप यांनी १६ जुलै रोजी रत्नागिरी ग्रामीण पोलिस स्थानकात तक्रार दिली आहे. त्यानुसार अश्विनी ओझा हिच्यावर भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम २८५ अन्वये २३ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा झाला आहे.