(लांजा)
गेली अनेक वर्ष रखडलेल्या लांजा शहरातील महामार्गावर असलेल्या उड्डाणपुलाचे काम आता मोठ्या जोमाने सुरू झाल्याने जनतेमधून समाधान व्यक्त केले जात आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून संथ गतीने सुरु आहे. मात्र शहरांमध्ये उड्डाण पुल उभारण्याच्या कामाला गती मिळाल्याचे चित्र आहे.
लांजा शहरांमध्ये उड्डाण पुल बांधण्यात येणार असल्याने दुतर्फा असलेल्या छोटे दुकानदार यांना त्यावेळी हटवण्यात आले होते. सात ते आठ वर्षांपूर्वी शहरांमध्ये उड्डाण पुलाच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती. त्यानंतर सात ते आठ उड्डाण पुलाचे खांब बांधण्यात आल्यानंतर पूर्णतः काम ठप्प झालेले होते. शहरातील उड्डाणपुल कधी होणार याकडे शहरवासीयांचे तसेच व्यापारी वर्गाचे लक्ष लागून राहिले होते. उड्डाण पुलाचे काम अर्धवट असल्याने शहरात उन्हाळ्यात धुळीचे तर पावसाळ्यात चिखल मातीचे साम्राज्य निर्माण होत असल्याने येथील व्यापारी, ग्रामीण भागातील नागरिक, शहराच्या ठिकाणी येणाऱ्या लोकांना याचा त्रास सहन करावा लागत होता. शहरातील कोर्ले फाटा ते साटवली फाटा बाजारपेठ सदरील उड्डाण पुल होणार आहे.
उड्डाण पुलाच्या कामाला सुरुवात
गेली अनेक वर्षे रखडलेल्या उड्डाण पुलाच्या कामाला जून महिन्यापासून सुरूवात करण्यात आली होती. सध्या कोर्ले फाटा ते बाजारपेठ पर्यंत खांब उभे करण्यासाठी ड्रिल मारण्याचे काम पूर्ण झाले असून आता खांब उभे करण्याचे काम सुरु आहे. बाजारपेठेत आधी उभारण्यात आलेल्या दोन खांबामधील अंतर कमी करण्याच्या दृष्टीने दोन खांबामध्ये खांब उभे करण्यासाठी ड्रिल मारण्याचे काम सुरु आहे. तर काही ठिकाणी खांब उभे करण्याचे काम सुरु आहे. पावसाळ्यात तर यामुळे अनेक समस्या निर्माण होणार आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून उड्डाणपुलाच्या कामाला भर पावसातून गती मिळाल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
महामार्गाचे काम कधी पूर्ण होणार?
मात्र, महामार्गाच्या कामाला अद्याप गती नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. तालुक्यातील काजळी व बेनी नदीवरील एका साइटच्या पुलाच्या कामांना अद्यापही सुरुवात न झाल्याने महामार्गाचे काम कधी पूर्ण होणार आणि अजून किती वर्ष लागणार आहेत असा सवाल नागरिकांमधून केला जात आहे. वेरळ, आंजणारी, वाकेड येथील घाटातील काम देखील अर्धवट स्थितीत आहे. पक्क्या स्वरूपाचे सर्व्हिस, अॅप्रोच, डायवर्जन रोड करण्यात आलेले नसल्याने संपूर्ण बाजारपेठ आणि लांजा शहर धुळीच्या त्रासाने हैराण झाले आहे. महामार्गावरून मोठमोठाल्या वाहनांची नियमितपणे वाहतूक होत असल्याने या धुळीचा प्रचंड त्रास होत आहे. रेस्ट हाऊस ते बसवेश्वर चौक असा सर्व्हिस रोड पूर्ण शहरात तयार होणे गरजेचे आहे. लांजा बाजारपेठेला वाचविण्यासाठी बायपास असावा, अशी भूमिका घेऊन महामार्ग प्रकल्पबाधित संघर्ष समितीने आवाज उठविला होता.