(रत्नागिरी)
गेल्या २५-३० वर्षांपासून शिवसेना पक्षात कार्यरत असलेल्या तालुक्यातील माजी पंचायत समिती सभापती सौ.संजना उदय माने व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे वाटद विभागप्रमुख श्री उदय शंकर माने (जयगड-खंडाळा) यांनी राज्याचे माजी मंत्री, आमदार रवींद्र चव्हाण आणि रत्नागिरी भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला.
सौ. संजनाताई माने ह्या पंचायत समिती सभापती होत्या, त्यांचे कार्य विभागातील सर्व लोकांना समाधानकारक होते, त्यांचे वैद्यकीय क्षेत्रात देखील अखंड कार्य सुरू होते. तर उदय यांनी आपल्या शालेय जीवनापासूनच सामाजिक व राजकीय कार्याला सुरुवात केली आहे.
कुठलेही सुख – दुःखात, कुठलाही जातपात धर्म न पाहता सहभागी होणारे एक गोरगरिबांचे कैवारी व अपघातग्रस्तांचा देवदूत म्हणून उदय माने यांचे नाव विभागात आदराने घेतले जाते. सर्वपक्षीय कार्यकर्ते व पदाधिकारी यांचेबरोबर त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत. भाजपा प्रवेशाबाबत सर्वांनीच त्यांना त्यांच्या पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.