(तरवळ/ अमित जाधव)
रत्नागिरी तालुका पंचायत समितीचे माजी उपसभापती, तरवळ गावचे माजी सरपंच, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील धडाडीचे कुशल नेतृत्व करणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाळकृष्ण उर्फ बाळासाहेब देमाजी मायंगडे यांचे रविवार दि. २ जून रोजी सकाळी वयाच्या ८० व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
बाळासाहेब मायंगडे यांनी जनमानसात उठावदार कार्य केले. जुनी चौथीपर्यंत शिकलेली व्यक्ती सरपंच ते रत्नागिरी तालुका पंचायत समितीचे उपसभापती अशी त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. तरवळ तसेच जाकादेवी पंचक्रोशीमध्ये त्यांचे सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांशी सलोख्याचे संबंध होते. सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रातील धडाडीचे नेतृत्व करणारे समाजामध्ये सामाजिक सलोखा निर्माण करण्यासाठी सदैव अग्रस्थानी असणारे, आपल्या कार्यक्षेत्रातील मूलभूत विकासकामांना मार्गी लावण्यासाठी सदैव तत्पर असणारे, सर्वच राजकीय पक्षांशी सलोख्याचे संबंध जपणारे व कायम स्वीकारलेल्या राजकीय पक्षांशी एकनिष्ठ राहिलेले, या पंचक्रोशीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते म्हणून एक वेगळी ओळख निर्माण त्यांनी केली होती.
बाळासाहेब मायंगडे यांच्या जाण्याने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या जाण्याने गावातील एक जुना जाणता माणूस गेल्याचे बोलले जात आहे त्यांच्या कार्यकाळात गावातील अनेक कामे मार्गी लावण्यासाठी सदैव तत्पर राहून ती पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा देखिल केला.त्यांच्या अंत्यविधी साठी विविध स्तरातून मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.