(पुणे)
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर रविवारी रात्री गोळीबार करण्यात आला. त्यानंतर त्यांच्यावर कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली. त्यांच्या बहिणीच्या नवऱ्यानेच ही हत्या केली असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
वनराज आंदेकर यांच्या बहिणीने पोलिस ठाण्यातच पोलिसांसमोर धमकी दिली होती. ‘आम्ही तुला जगू देणार नाही, तुला आज पोरं बोलवून ठोकते’, अशा शब्दात धमकावले होतं. त्यानंतर दुसऱ्याच दिवशीच म्हणजे रविवारी (ता.१) वनराज यांची हत्या झाली आहे.
वनराज आंदेकर हे रविवारी रात्री साडे आठ वाजता नाना पेठेतल्या डोके तालीम परिसरात उभा होते. तेव्हा दुचाकींवरून आलेल्या हल्लेखोरांनी बंदुकीतून पाच राऊंड फायर केले. मात्र आंदेकर यांना गोळी लागली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. गोळीबारानंतर हल्लेखोरांनी कोयत्याने त्यांच्यावर वार केले. हे वार वर्मी बसल्याने आंदेकर गंभीर जखमी झाले होते. रुग्णालयात नेण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता.
वनराज यांचा खून त्यांच्या सख्ख्या दाजीने केला आहे. गणेश कोमकर आणि जयंत कोमकर यांच्यासह दोन सख्ख्या बहिणींना पोलिसांनी अटक केली आहे. वनराज यांच्या बहिणीचा आणि वनराज यांचा घरगुती वाद होता. आंदेकरनी कोमकर कुटुंबाला एक दुकान चालवायला दिले होते. पण, ते दुकान पुणे मनपाने अतिक्रमण कारवाईमध्ये पाडले. त्याच रागातून सख्ख्या दाजीने वनराज आंदेकरची हत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे.
सख्ख्या बहिणीनेच वनराज आंदेकर यांना पोलिस ठाण्यात थेट जीवे मारण्याची धमकी दिली होती. वनराज, ‘आम्ही तुला जगु देणार नाही. तु आमच्यामधे आला आहेस. तु आमचे दुकान पाडण्यास सांगुन आमच्या पोटावर पाय देतोस काय? तुला आज पोर बोलावुन ठोकतेच.’ असे धमकावले होते. यानंतर दुसऱ्याच दिवशी वनराजची खरोखरच हत्या झाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
2017 ते 2022 या कालावधीत वनराज आंदेकर नगरसेवक होते. त्याआधी वनराज यांची आई राजश्री आंदेकर या नगरसेवक होत्या. 2007 आणि 2012 अशा सलग दोन टर्म त्यांनी नगरसेवक पद भुषवलं होतं. तर वनराज यांचे चुलते उदयकांत आंदेकर हेसुद्धा नगरसेवक होते. वत्सला आंदेकर या पुण्याच्या महापौर होत्या.