(खेड)
दोन वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या कारवाईत चिपळूण वन विभागाने बिबट्याची नखे विक्रीसाठी आलेल्या चौघांच्या मुसक्या आवळल्या. या कारवाईत बुधवारी मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे जाधववाडी येथे तिघांना तर गुरुवारी साखरपा येथे एकाला ताब्यात घेतले आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे (ता. खेड) गावच्या हद्दीतील जाधववाडी या ठिकाणी बुधवारी बिबट्याची नखे विक्रीसाठी रिक्षामधून काही जण येणार असल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती. त्यानंतर वन विभागाच्या पथकाने या ठिकाणी सापळा रचला होता. या भागात दिलीप सावळेराम कडलग (४८, रा. घाटकोपर, मुंबई), अतुल विनोद दांडेकर (३६ रा. चेंबूर, मुंबई) व विनोद पांडुरंग कदम (४२ रा. सावर्डे, ता. चिपळूण) हे रिक्षा (एमएच ०३, बीए ९७१२) मधून संशयितरित्या फिरताना दिसले. वन विभागाच्या पथकाला संशय आल्याने त्यांनी तिघांना थांबवून त्यांची झडती घेतली. या झडतीत त्यांच्याकडून बिबट्याची एकूण ४ नखे सापडली. वन विभागाने तिघांसह चार नखे आणि रिक्षा हस्तगत केली आहे.
दरम्यान, वन विभागाने ताब्यात घेतलेल्या अतुल दांडेकर याने दिलेल्या माहितीनुसार साखरपा (ता. संगमेश्वर) येथे गुरुवारी सापळा लावण्यात आला. या सापळ्यात दुचाकीवरून आलेल्या सचिन रमेश गुरव (रा. गोविळ, ता. लांजा) याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे बिबट्याची ४ नखे सापडली. ही नखे व दुचाकी जप्त करण्यात आली आहे. त्याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रत्नागिरीचे या कारवाईत (चिपळूण) विभागीय वन अधिकारी वैभव बोराटे, दापोलीचे परिक्षेत्र वन अधिकारी प्रकाश पाटील, प्रकाश सुतार, सुरेश उपरे, साताप्पा सावंत, रामदास खोत, वनपाल फिरते पथक तौफिक मुल्ला, अशोक ढाकणे, परमेश्वर डोईफोडे, प्रियांका कदम, शुभांगी भिलारे यांनी सहभाग घेतला.