(रत्नागिरी)
मत्स्य महाविद्यालय, पेठकिल्ला, रत्नागिरी च्या प्रथम बॅचचे (१९८१-१९८४ बॅच) माजी विद्यार्थी आणि आता वेरावळ, गुजरात येथे असणाऱ्या निशीइंडो फूड्सचे संचालक श्री. दीपक चौधरी यांनी, मत्स्य विद्या शाखेतील “बेस्ट डिप्लोमा अभ्यासक्रम” हा साल २०२३-२४ साठी डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठातर्फे दिला जाणारा पहिलाच पुरस्कार प्राप्त झालेल्या, मत्स्य अभियांत्रिकी पदविका महाविद्यालयास नुकतीच भेट दिली. कॅम्पसमधील मत्स्य अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या सुविधांमुळे श्री. चौधरी खूप प्रभावित झाले.
त्यांच्या भेटीदरम्यान, विद्यार्थ्यांना संबोधित करताना त्यांनी आपल्या क्षेत्रात यश आणि आनंद मिळवण्यासाठी नावीन्य, आत्मविश्वास, आवड, छंद, विश्वास, प्रामाणिकपणा आणि सत्यता, त्याचबरोबर समाजाचे ऋण फेडण्यासाठी झटणे अशा गोष्टी विद्यार्थ्यांपुढे मांडल्या. यासाठी आपले मानसिक आणि शारीरिक आरोग्य यावरही लक्ष देण्याचे त्यांनी प्रतिपादन केले. त्यांनी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्स्फूर्तपणे उत्तरे दिली आणि मत्स्यव्यवसाय क्षेत्रात ‘महिला सक्षमीकरण’ वर भर दिला. याचवेळी त्यांनी येथील तृतीय वर्षाच्या सहाव्या सत्रातील विद्यार्थांना, विशेषतः विद्यार्थिनींना वेरावळ, गुजरात येथील त्यांच्या प्रोसेसिंग युनिटमध्ये सर्व उपलब्ध सुविधांचा लाभ घेत, इन-प्लांट ट्रेनिंग प्रोग्राम घेण्याची सुवर्ण संधी देण्याचे आश्वासनही दिले. शाश्वत पद्धतीने मत्स्यव्यवसाय क्षेत्रात यश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना सहाय्य करण्यासाठी मत्स्य अभियांत्रिकी महाविद्यालयाबरोबर दीर्घकालीन सहकार्य करण्याचीही इच्छा त्यांनी व्यक्त केली.
या त्यांच्या आश्वासनानुसार डॉ. संजय भावे, कुलगुरू, डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाच्या याच्या संमतीने तसेच विद्यापीठाचे शिक्षण संचालक, डॉ. प्रशांत बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली, मत्स्य अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कु. श्रावणी बाणे, कु. जान्हवी कदम, कु. मौसमी कोयांडे, कु. अर्चिता पाटील, कु. कृतज्ञता पाटील, कु. वेदांती शिर्के या सात विद्यार्थिनी व श्री. ओंकार कांबळे या विद्यार्थ्याची निशीइंडो फूड्सच्या वेरावळ, गुजरात येथील मत्स्यपदार्थ निर्यात करणाऱ्या चार प्लांट्समध्ये चार महिन्याच्या इंडस्ट्रिअल ट्रेनिंगसाठी निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्राबाहेरील राज्यात जाऊन तेथील मत्स्य व्यवसायाशी निगडित असणाऱ्या प्रथितयश कारखान्यात प्रशिक्षण घेण्याची ही सुवर्ण संधी प्रथमच या मत्स्य अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना, विशेषतः विद्यार्थिनींना मिळत आहे. निशीइंडो फूड्सच्या सुरमी प्लांट, स्क्विड लिव्हर मिल प्रोसेसिंग प्लांट आणि माशांपासून मूल्यवर्धित खाद्यपदार्थ निर्मितीत क्रॅकर्स किंवा वेफर्ससारखे रेडी टू इट पदार्थ तयार करणाऱ्या प्रक्रिया कारखान्यात या विद्यार्थ्यांना काम करून प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी विद्यापीठाने आणि निशिइंडो फुड्सने उपलब्ध करून दिली आहे.
जॅपनीज तंत्रज्ञान वापरणाऱ्या या उद्योगाच्या प्रक्रिया कारखान्यांमध्ये प्रशिक्षण घेतल्याने या विद्यार्थ्यांना निश्चितच भविष्यात त्याचा उपयोग करून घेता येईल. या महाविद्यालयाचे श्री. तौसिफ़ काझी, सहा. प्राध्यापक व मोड्यूल कॉर्डीनेटर (फिश प्रोसेसिंग अँड रेफ्रिजरेशन मशिनरी) हे या विद्यार्थ्यांना त्यांच्या या प्रशिक्षणासाठी समन्वयक म्हणून मदत करतील. ही संधी या विद्यार्थ्यांना मिळावी यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आशिष मोहिते यांनी विशेष प्रयत्न केले.