(संगमेश्वर / एजाज पटेल)
रविवार दुपार पासून सरू असलेल्या ढगफुटी पावसामुळे संगमेश्वर येथील सोनवी नदी व शास्त्रीखाडीच्या नेहमीच्या पातलीत वाढ होऊन हा-हा म्हणता संगमेश्वर येथील मच्छि मार्केट, आठवडा बाजार, रामपेठेत पुराचे पाणी घुसू लागल्याने एकच धावपळ उडाली. मुंबई-गोवा महामार्गांवरील निकृष्ट कामामुळे झालेली दुरावस्थाही पहिल्याच पावसात पुढे आली आहे.
संगमेश्वर भागाला काळ शनिवारी पावसाने दिवसभर अविश्रांत चांगलेच झोडपून काढले त्यामुळे पुराचे पाणी येण्याची भीती होती. मात्र रात्रौ पावसाने विश्रांती घेतल्याने व रविवारी दुपार पर्यंत तेवढासा जोर नसल्याने पुराची भीती दूर झालेली असताना रविवारी दुपार नंतर पुन्हा पावसाने रौद्ररुपच धारण केले. ढगफुटी सारख्या कोसळणाऱ्या व तेही कोणतीही विश्रांती न घेता अविश्रांत कोसळणाऱ्या पावसामुळे येथील सोनवी नदी तसेच शास्त्री खाडीच्या नेहमीच्या पाण्याच्या पातळीत कमालीची वाढ होत जाऊन या दोन्ही नद्यांनी नेहमीची पातळी ओलांडून व ह्या नद्या दुथडी भरून वाहू लागल्याने पुन्हा एकदा पुराची भीती निर्माण होऊन ती कही तासातच सत्यात उतरली.
देवरूख- संगमेश्वर मार्गावरील बुरंबी येथे रस्त्यावर पुराचे पाणी आल्याने काहीकाळ वाहतुक बंद ठेवण्यात आली होती. माखजन बाजारपेठेलाही पुराचा धोका असल्याचे चित्र निर्माण झाले होते. माखजन बाजारपेठेत पुराचे पाणी घुसल्यामुळे व्यापाऱ्यांचे काहीअंशी नुकसान झाले. किरडुवे बारेवाडी येथे बावनदीचे पाणी शेतात घुसले असल्याने शेतीचे नुकसान झाले. मुसळधार पावसामुळे तालुक्यातील शास्त्री, सोनवी, काजळी, बावनदी, सप्तलिंगी या नद्या दुथडी भरून वाहत आहेत.
बाजारपेठत पाणी
संगमेश्वर येथील कोंबडी तसेच मच्छि मार्केट येथे पुराचे पाणी भरल्याने तेथील व्यापाऱ्यांची दुकानातील माल सुरक्षित स्थळी हालवण्यासाठी धडपड सुरु झाली होती. तर येथील आठवडा बाजारात सुमारे तीन ते चार फूट पाणी होते येथील नितीन शेट्ये, प्रदीप शिंदे यांचे समर्थ मेडिकल, रुद्विक वडा पाव सेंटर आदी दुकानात पाणी घुसले तर त्या पुढील दुकानांही पुराची भीती असल्याने ते व्यापारी आपल्या दुकानातील व काही घरानाही धोका असल्याने ते सुरक्षित स्थळी आपला सामान भरपावसातून हलवण्याची कसरत करत होते.
रामपेठेत बाजारपेठेत व आठवडा बाजार पाण्याखाली या ठिकाणची दुकाने पाण्याखाली गेली असून या ठिकाणी तीन ते चार फूट पाणी होते. तर या ठिकाणीहुन मापारी मोहल्ला तसेच राष्ट्रीय महामार्गांवर जाणारा मार्ग पुराच्या पाण्यामुळे बंद झाला आहे. अविश्रांत धो -धो कोसळणाऱ्या पावसामुळे सर्वत्र पाणी पाणी होऊन संपूर्ण संगमेश्वर जलमय झाला असून जनजीवच विस्कळीत झाले असून संध्याकाळी उशिरा पर्यत पाऊस उसंतीच घ्यायला तयार नसल्याने व पुराचे पाणी भरण्याचा वेग पाहता संगमेश्वरवासिय भीतीच्या छायेत होती.
माणुसकीचा अनुभव
संगमेश्वर येथील पोलीस पाटील रंगराज कोळवणकर यांनी संगमेश्वरवासियांना पुराच्या धोक्यात पासून सावध राहण्याचे सूचना सर्वांना दिल्या. मात्र एवढ्यावरच न थांबता त्यांनी स्वतः ज्या दुकानात पुराचे पाणी भरत होते, त्या त्या दुकानात जाऊन त्यांच्या दुकानातील माल इतर ठिकाणी हालवण्यासाठी मदत करत असल्याचे दिसून आले.