संगमेश्वर तालुक्यातून वाहणाऱ्या शास्त्री, सोनवी, गडगडी आणि बावनदीची पाण्याची पातळी वाढली आहे. तर सलग पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे संगमेश्वर बाजारपेठेतील रामपेठ, माखजन आणि कसबा बाजारपेठेसह मुख्य बाजारपेठांमध्ये पुराचे पाणी घुसले आहे.
शास्त्री नदीचे पाणी रामपेठ बाजारपेठेमध्ये घुसल्याने येथील व्यापाऱ्यांची दुकाने पाण्याखाली गेली आहेत. तसेच संगमेश्वर असुर्डे जोड रस्त्याला पुराचे पाणी आल्याने हा मार्ग बंद झाला आहे. कसबा बाजारपेठेलाही पुराचा फटका बसला असून काझीमोहल्ला या ठिकाणी पुराचे पाणी रस्त्यावर चढले आहे त्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे.
फुणगुस मार्गावर आंबेड येथे पाणी चढल्याने मार्ग बंद झाला आहे. संगमेश्वर बाजारपेठे मधील मच्छी मार्केट पाणी घुसल्याने मच्छी मार्केट बंद झाले. मुसळधार पावसाचा फटका एस टी वाहतुकीलाही बसला असून अनेक प्रवासी संगमेश्वर बस स्थानकामध्ये अडकून पडले होते.
गडनदीला पूर आल्याने पुराचे पाणी पुन्हा माखजन बाजारपेठेत घुसले आहे. यामुळे पुन्हा एकदा व्यापाऱ्यांना मोठा फटका बसला आहे. गडनदी किनाऱ्या लगतची शेती पाण्याखाली गेली असल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
गावागावा मध्ये असणाऱ्या ओढ्याना मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने रस्ते बंद झाले आहेत. गडनदी च्या पुरामुळे माखजन कासे पुलाच्या दुतर्फा पाणी आल्याने माखजन कासे मार्ग बंद झाला आहे. यामुळे माखजन पासून कासे, कळंबुशी, पेंढाबे, नारडूवे, असावे, शिरंबे.आदी गावांचा मार्ग बंद झाला आहे.
रस्ते बंद झाल्याने वाहने अडकून पडली आहेत. पावसाची संततधार कायम असल्याने पाण्याची पातळी अधिक वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुराच्या पाण्याने व ओढ्यांच्या लगत असलेली शेती पाण्याच्या दाबामुळे अनेक ठिकाणी वाहून गेली आहे. एकूणच आजच्या या पावसाचा चांगलाच फटका बसला आहे.