(रत्नागिरी)
दुसऱ्या वर्षाच्या मत्स्य अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी १० दिवसांचा शैक्षणिक अभ्यास दौरा डॉ. संजय भावे, कुलगुरू, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांच्या मान्यतेने आणि डॉ. प्रशांत बोडके, शिक्षण संचालक यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता. या अभ्यास दौऱ्या दरम्याने विद्यार्थ्यांनी हंस एक्वाकल्चर फार्म कोलाडला भेट देऊन शोभिवंत मासे संवर्धन बाबत विविध प्रात्यक्षिक द्वारे ज्ञान अर्जित केले .
हंस एक्वाकल्चर फार्म हे मरीन प्रॉडक्ट्स एक्स्पोर्ट डेव्हलपमेंट अथॉरिटी (MPEDA) कडून भारतामधे दुसऱ्या क्रमांकाचे उत्कृष्ट शोभिवंत माशांचे फार्म म्हणून सन्मानीत केले गेले आहे. प्रथमतः श्री. हसन म्हसलाई यांनी विद्यार्थ्यांना हंस एक्वाकल्चर फार्मची आणि त्यांच्या अंतर्गत असणाऱ्या विविध प्रकल्पांची ओळख आणि माहिती करून दिली. विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात गोड्या पाण्याचे विविध प्रकारचे शोभिवंत मासे, त्यांची पैदास व बीज उत्पादन तंत्रज्ञान, अन्न व खाद्य व्यवस्थापन, कृत्रिम खाद्य तयार करणे, विविध शोभिवंत मासे रोग व रोग नियंत्रण, शोभिवंत माशांसाठी पाण्याचे गुणवत्तेचे व्यवस्थापन श्री. हसन म्हसलाई व श्री. जाकीर म्हसलाई यांच्याकडून प्रात्यक्षिकाद्वारे समजून घेतले.
विद्यार्थ्यांनी तीन दिवस फार्म वरती राहून शोभिवंत मासे हॅचरी तसेच फार्मच्या डिझाइन व बांधकामाच्या पैलूंचा आणि विविध प्रकारचे इनडोअर आणि आउटडोअर मत्स्य टाकी आणि त्यांची संरचनाचा सखोल अभ्यास केला. एकूण १७ विद्यार्थी (१३ विद्यार्थी आणि ४ विद्यार्थिनी) या दौऱ्यात सहभागी झाले होते.
या शैक्षणिक दौऱ्याचे आयोजन व नियोजन सहायक प्राध्यापक, श्री. तौसीफ काझी आणि श्री. निलेश मिरजकर, व कर्मचारी श्री. अभिजित पाटील आणि श्री. दिग्विजय चौगले यांनी प्राचार्य आशिष मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली केले. पहिल्या दिवशी या फार्मला डॉ. आशिष मोहिते यांनी भेट देऊन हंस एक्वाकल्चर अंतर्गत चालणाऱ्या विविध प्रकल्पांची माहिती घेतली आणि श्री. हसन म्हसलाई व श्री. जाकीर म्हसलाई यांचे विद्यार्थ्यांना हंस मत्स्यपालन केंद्राला भेट देण्याची परवानगी दिल्याबद्दल आणि आवश्यक प्रत्यक्षिकांसहित अभ्यासाची तसेच निवास व भोजन व्यवस्था केल्याबद्दल आभार मानले.