( जळगाव )
येथील रावेर मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार शमिभा पाटील या पक्षाच्या माध्यमातून विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या राज्यातील पहिल्याच तृतीयपंथी अधिकृत उमेदवार ठरल्या आहेत. राज्याच्या ६४ वर्षांच्या इतिहासात एखाद्या पक्षाकडून अधिकृत उमेदवार म्हणून तृतीयपंथी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची ही पहिलीच वेळ आहे.
रावेर मतदारसंघातील केळी मजुरांच्या समस्यांसाठी केळी मजूर विकास महामंडळाचा मुख्य मुद्दा घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या शमिभा पाटील यांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. मागील १५ वर्षांपासून शमिभा पाटील तृतीयपंथींसह आदिवासी व भटक्यांच्या हक्कासाठी लढत असून, पाच वर्षांपासून त्या वंचित बहुजन आघाडीचे काम करीत आहेत. रस्त्यावर उतरून लढा देताना येणाऱ्या मर्यादा लक्षात घेऊन राजकीय भूमिका असावी, असे वाटल्यानंतर निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतल्याचे शमिभा पाटील सांगतात.
समदु:खींसाठी रिंगणात
रावेर मतदारसंघातील असंघटित कामगार, आदिवासी या माझ्या समदु:खी घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी पुढे जाणे आवश्यक वाटल्याने निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला. मतदारसंघात पावणेदोन लाख असंघटित केळी मजूर आहेत. त्यांच्याकडे कधीही संवेदशील पद्धतीने पाहिले गेले नाही. त्यांना माथाडी कामगार म्हणून मान्यता मिळावी, केळी मजूर महामंडळ स्थापन व्हावे, आदिवासींचे प्रश्न, सुशिक्षित बेरोजगारांचा मोठा प्रश्न आहे. समृद्ध जैवविविधतेने संपन्न सातपुड्यातील आदिवासींच्या न्यायासाठी, तसेच केळीवरील प्रक्रिया उद्योगद्वारे उद्योग निर्माण व्हावेत, या मुद्द्यावर निवडणूक लढविणार असल्याचेही शमिभा पाटील यांनी सांगितले.
श्याम झाला शमिभा…
भुसावळ येथील रहिवासी असलेल्या शमिभा पाटील यांचे मूळ नाव श्याम भानुदास पाटील असे आहे. फैजपूर येथून त्यांनी एम. ए. मराठीची पदवी घेतली. सध्या त्या कवी ग्रेस यांच्या साहित्यावर पीएच.डी. करीत आहेत. त्यांनी वयाच्या तिसाव्या वर्षी अर्थात, नऊ वर्षांपूर्वी तृतीयपंथी असल्याचे जाहीर केले. २०१४ मध्ये त्यांना तृतीयपंथी म्हणून नागरिकत्वदेखील मिळाले. तेव्हापासून त्या तृतीयपंथींच्या न्याय्य हक्कांसाठी रस्त्यावर उतरून लढा देत आहेत. पोलिस भरतीमध्ये तृतीयपंथींना आरक्षण मिळण्यासाठीदेखील त्यांनी न्यायालयीन लढा दिलेला आहे.
शबनम मावशी पहिल्या खासदार
भारतात तृतीयपंथींना १९९४ मध्ये प्रथमच मतदानाचा अधिकार मिळाला होता. तीस वर्षांपूर्वी १९९८ ते २००३ या काळात मध्य प्रदेशमधील भोपाळमधून शबनम मावशी या भारतातील पहिल्या तृतीयपंथी खासदार म्हणून निवडून आलेल्या होत्या.