(पुणे)
पिंपरी-चिंचवडच्या थेरगाव येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका व्यक्तीने आपल्या सात वर्षीय मुलीचा दोरीने गळा आवळून स्वत: गळफास घेत आमहत्या केली. ही घटना मंगळवारी उघडकीस आली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले असून ते शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. आर्थिक विवंचनेतून वडिलांनी हे टोकाचे पाऊल उचलले असल्याची माहिती प्राथमिक तपासात उघड झाली आहे. वाकड पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भाऊसाहेब बेदरे (वय ४३) असे आत्महत्या केलेल्या वडिलांचे नाव आहे. तर राज नंदिनी भाऊसाहेब बेदरे (वय ७) असे खून केलेल्या सात वर्षीय मुलीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाऊसाहेब हे पत्नी राजश्री सोबत थेरगाव येथे राहत होते. त्यांची पत्नी ही बाहेर गावी गेली होती. राजश्री या काल सकाळी गावावरून शिवाजीनगर बसस्थानक येथे आल्या. त्यांनी त्यांना घेऊन जाण्यासाठी पती भाऊसाहेब यांना फोन केला. यावेळी भाऊसाहेब हे घेण्यासाठी येतो म्हणाले. दरम्यान, राजश्री या त्यांची वाट पाहत होत्या. बराच वेळ वाट पाहून देखील ते आले नसल्याने त्यांनी भाऊसाहेब यांना फोन केला. मात्र, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. यामुळे राजश्री या थेट घरी बसने निघाल्या. त्या घरी आल्या असता, त्यांच्या मुलगा आशिषने याने दरवाजा उघडला.
यावेळी राजश्री यांनी पती भाऊसाहेब कुठे आहेत असे विचारले, यावेळी राजश्री या घरात गेल्या असता स्वयंपाक खोलीत त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसले. तर राज नंदिनी देखील मृतावस्थेत त्यांना दिसली. या घटनेमुळे राजश्री या हादरल्या. भाऊसाहेब यांनी आधी मुलीचा खून केला आणि त्यानंतर स्वत: आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
बेदरे कटुंब मागील 15 वर्षापासून पिंपरी चिंचवड शहरात वास्तव्यास आहे. भाऊसाहेब बेदरे हे खासगी नोकरी करीत होते. मात्र, काही महिन्यांपूर्वी त्यांची नोकरी गेल्याने ते चारचाकी वाहन चालवत होते. परंतु यातून पुरेसे उत्पन्न मिळत नसल्याचे त्यांना आर्थिक चणचण भासत होती. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असता त्या ठिकाणी पोलिसांना एक सुसाईट नोट आढळून आली. त्यामध्ये भाऊसाहेब यांनी गावाकडील जागा विकली, मात्र, त्यातून काहीच रक्कम मिळाली नाही, असे लिहिले होते. वाकड पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
Follow us on Google News : https://news.google.com/s/CBIw9dzq7KQB?sceid=IN:en&sceid=IN:en&sceid=IN:en&r=0&oc=1