[ दिपक कांबळे / साखरपा ]
संंगमेश्वर तालुक्यातील करंजारी बाजारपेठ येथील विलास बेर्डे यांच्या विहिरीत बिबट्या पडल्याचे मंगळवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास निदर्शनास आले. यानंतर ८ वाजल्यापासून वनविभागाकडून या बिबट्याला पिंजऱ्याच्या सहाय्याने विहिरीबाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले. अखेर सायंकाळी ७.१५ वा. तब्बल ११ तासांनंतर या बिबट्याला विहिरीबाहेर काढण्यात वनविभागाला यश आले. या बिबट्याला वनविभागाने सुखरूपपणे विहिरीबाहेर काढून जीवदान दिले आहे. तर बिबट्याची वैद्यकिय तपासणी करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
करंजारी बाजारपेठ येथील विलास बेर्डे यांचा पाळीव कुत्रा मंगळवारी सकाळी ७ वा. विहिरीजवळ जाऊन परत मागे यायचा. म्हणून त्यांनी विहिरीत डोकाऊन बघितले असता विहिरीत बिबट्या पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याची खबर वनविभागाला देण्यात आली. यानंतर वनविभागाचे रत्नागिरीचे परिक्षेत्र वनाधिकारी प्रकाश सुतार, देवरूखचे वनपाल तौफीक मुल्ला, पालीचे वनपाल न्हानू गावडे तसेच रत्नागिरी, देवरूख व पालीचे वनरक्षक यांनी घटनास्थळी पिंजऱ्यासह धाव घेतली.
यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने वनविभागामार्फत विहिरीत पिंजरा सोडून बिबट्याला विहिरीबाहेर काढण्याचे रेस्क्यू आँपरेशन सुरू करण्यात आले. दिवसभर हे रेस्क्यू आँपरेशन सुरू होते. विहिरीतील एका बाजूला असलेल्या काचरात (खब) हा बिबट्या लपून बसल्याने बिबट्याला विहिरीबाहेर काढण्यात वनविभागाला अपयश येत होते. मात्र वनविभागाच्या अधिकारी व कर्मचार्यांनी हार न मानता बिबट्याला विहिरीबाहेर काढण्याचे प्रयत्न सुरूच ठेवले. अखेर सायंकाळी ७.१५ वा. बिबट्याला पिंजऱ्याच्या सहाय्याने विहिरीबाहेर काढण्यात वनविभागाला यश आले. आणि सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला.