( लांजा )
तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून ग्रामीण भाग असलेल्या खानवलीसह इतर आजूबाजूच्या गावामधून विज गायब होती. प्रत्येकाच्या घरोघरी मेणबत्ती, कंदीलाचा आधार घेऊन ग्रामस्थांना दिवस काढावे लागले होते. चार दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर शनिवारी दिनांक २७ जुलै २०२४ रोजी वीज पुरवठा सुरळीत करण्यात महावितरणच्या कर्मचाऱ्यांना यश आले आहे. यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हा महासचिव प्रशांत कदम यांनी महावितरण विभागाचे विशेष आभार व्यक्त केले आहे.
पावसाळ्याच्या दिवसात अचानक एखाद्या वाडीसह गावांची वीज खंडित झाल्यावर नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असते. गेल्या अनेक दिवसांपासून अनेक भागात बत्ती गुल होण्याचे प्रकार सुरू आहे. यातच पूनस वाघ्रत, उफळे ,साफुचेतळे, खानवली, कोट या गावांसह अनेक तालुक्यातील ग्रामीण भागात गेल्या चार दिवसांपासून वीज पुरवठा खंडित झाला होता. पूर्वी रेशन कार्डवर रॉकेल मिळायचे मात्र आता रॉकेल मिळत नसल्याने लोकांना २० रुपयांच्या मेणबत्तीशिवाय पर्याय नाही. मेनबत्तीच्या प्रकाशावर असे दिवस काढावे लागत असतील तर यातून नाहक भुर्दंड लोकांना सोसावा लागतो.
रिक्त पदे भरण्याची मागणी…
प्रत्यक्षात या विभागात मनुष्यबळाची कमतरता असल्याचे चित्र आहे. अपुऱ्या मनुष्यबळामुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांना ताण पडत आहे. झाड कोसळण्याची एखादी घटना घडल्यास यंत्रणेसह ग्रामीण भागातील नागरीकांना मोठ्या प्रमाणात फटका बसत असतो. त्यामुळे महावितरण कंपनीमधे रिक्त असणारी कर्मचाऱ्यांची पदे भरावी अशी मागणी देखील वंचित बहुजन आघाडीचे महासचिव प्रशांत कदम यांनी केली आहे.
‘महावितरण’चे विशेष आभार
ग्रामीण भागात जंगलांचा विस्तीर्ण भाग असल्याने यात निर्माण होणारे विषारी किडे-मुंग्यासह विषारी साप घरात घुसण्याची भीती असते. वीज पुरवठा खंडित झाल्याने खानवलीसह आजूबाजूच्या वाड्यांमधील नागरिकांना आधारात दिवस काढावे लागत होते. अखेर चार दिवसानंतर वीज पुरवठा सुरळीत झाला असून घरोघरी प्रकाश पडला आहे. यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हा महासचिव प्रशांत कदम यांनी महावितरण विभागाचे विशेष आभार मानले आहेत.