(रत्नागिरी)
कोकण रेल्वे मार्गावरअतिवृष्टीमुळे मंगळवारी पेडणे बोगद्यात रुळांवर चिखल आणि पाणी आल्याने वाहतूक बुधवार संध्याकाळी ५ वाजल्यापासून बंद होती. त्यानंतर रात्री उशीरा ही वाहतूक वेगमर्यादेसह पुन्हा सुरू करण्यात आली. मात्र मध्यरात्री ३ वाजता ही वाहतूक पुन्हा बंद करण्यात आली. यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प होती. प्रवाशांना याचा मोठा फटका बसला. बोगद्यामध्ये पाणी साचल्याने सुरक्षिततेच्या कारणावरून कोकण रेल्वेचा मार्ग बंद होता.
दरम्यान कोकण रेल्वेच्या पेडणे येथील बोगद्यातील वाहतूक पूर्ववत झाली आहे. बुधवारी (दि.१०) रात्री ८ वाजून ३५ मिनिटांनी TFC म्हणजेच ‘ट्रॅक फिटनेस सर्टिफिकेट’ प्राप्त झाल्यावर रेल्वे वाहतूक सुरू करण्याचे आदेश देण्यात आले. पेडणे बोगद्यातून पाहिली ट्रेन 22:34ला रवाना झाली आहे. विविध स्थानकात थांबवून ठेवलेल्या सर्व ट्रेन रवाना केल्याची माहिती कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडच्या जनसंपर्क अधिकारी यांनी दिली.
कोकण रेल्वे मार्गावरील पेडणे येथील भुयारी मार्गामध्ये रुळांच्या बाजूला जमिनीखालून मोठ्या प्रमाणात पाणी येऊ लागल्यामुळे विस्कळीत झालेली रेल्वे वाहतूक तब्बल १६ तासानंतर पूर्ववत झाली आहे. याबाबत बोलताना कोकण रेल्वेचे अध्यक्ष संतोष कुमार झा म्हणाले, या बोगद्यातील चिखल-पाणी काढण्यासाठी १००हून अधिक कामगार काम करत आहेत. त्यांचे २० ते २५ सुपरव्हायझर तसेच चीफ इंजिनियर स्तरावरील अभियंते, नॅशनल तसेच इंटरनॅशनल कन्सल्टंट यांच्या अथक परिश्रमातून बुधवारी (दि.१०) रात्री ८ वाजून ३५ मिनिटांनी TFC म्हणजेच ‘ट्रॅक फिटनेस सर्टिफिकेट’ प्राप्त झाल्यावर रेल्वे वाहतूक सुरू झाली आहे. याशिवाय बोगद्या संदर्भातील काही तज्ञ लोक देखील उपस्थित होते.