(रत्नागिरी)
चवदार तळे सत्याग्रह या क्रांतीदिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भारतीय संविधानाचा अवमान केल्याचा संतापजनक प्रकार “स्वराज्य” या व्हॉट्सॲप ग्रूपवर घडला आहे. विजय माने (राहणार क्रांतीनगर, रत्नागिरी) या व्यक्तीने संविधानाचा व डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान करणारी प्रतिक्रिया व्यक्त केली. याबाबत तालुक्यातील आंबेडकरी संघटना एकवटल्या असून आचारसंहितेचा ही भंग केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दखल करून तडीपार करा या मागणीचे निवेदन आंबेडकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी (दिनांक २२ मार्च २०२४ रोजी) रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केले.
या निवेदनात म्हटले आहे की, निवडणुकीची आदर्श आचार संहिता सुरू असताना विजय माने याने “स्वराज्य” या व्हॉट्सॲप ग्रुपवर सामाजिक तेड निर्माण होईल असे वक्तव्य करून आचारसंहिता भंग केला आहे. संविधानाबाबत व डॉ बाबासाहेब आंबेडकरांविषयी अवमानकारक विधान केलेला फोटो सर्वत्र व्हायरल झाला असून आंबेडकरी समाजात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. विजय माने या व्यक्तीचा सामाजिक तेढ निर्माण करण्याचा उद्देश असून सदर प्रकरणी आम्ही समाजातील सर्व संघटना एकत्रित असून या व्यक्ती विरोधात तत्काळ कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली निवेदनातून सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
परंतु रत्नागिरी पोलीस शहर निरीक्षक श्री तोरस्कर हे आम्हाला उडवा-उडवीची उत्तर देत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता सुरू असताना संविधान निर्माते डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानावर वादग्रस्त व अवमानकारक विधाने केली जात आहेत यावरून आचारसंहितेचा भंग होत नाही का? असा सवाल देखील उपस्थितीत करण्यात आला आहे.
कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास…
जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता पोलिस प्रशासनाने घेणे आवश्यक आहे. मात्र पोलीसांकडून येणारी उत्तरे संशयास्पद असून आपण सदर प्रकरणात गांभीर्याने लक्ष द्यावे, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता सुरू असताना विजय माने या व्यक्तीवर गुन्हा दाखल करून तडीपारीची कारवाई करावी. तसेच या व्यक्ती विरोधात ठोस भूमिका घेतली नाही व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास रत्नागिरी पोलीस प्रशासन व जिल्हा प्रशासन जबाबदार असेल असा इशारा ही सर्व आंबेडकरी संघटनांच्या वतीने निवेदनातून प्रशासनाला देण्यात आला आहे.
निवेदन सादर करताना विविध संघटनेचे पदाधिकारी प्रीतम आयरे, प्रदीप पवार , समीर जाधव, किरण पवार, पंकज पवार,किशोर पवार सिद्धार्थ जाधव सुनील जाधव धीरज पवार आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थितीत होते.
आरोपीला पोलीसांकडून अप्रत्यक्ष अभय?
त्यानंतर आंबेडकरी पदाधिकाऱ्यांनी जयस्तंभ येथील पत्रकार कक्षात पत्रकार परिषद घेतली. यावेळी स्थानिक पोलीस प्रशासनावर अनेक सवाल उपस्थितीत करून विजय मानेला पोलीस प्रशासन पाठीशी घालत असल्याचा आरोप ही करण्यात आला आहे. गुरुवारी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास संबधित अवमान करणाऱ्या विजय मानेला बोलावून घेतो असे पोलीस निरीक्षक तोरसकर यांनी कार्यकर्त्यांना सांगितले होते. मात्र मानेला पोलिसांनी समाजाच्या समोर आणला नाही. यावरून पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचे स्पष्ट होत आहे असे प्रितम आयरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
पोलिसांची प्रतिमा मलीन
या प्रकरणाचे गांभीर्य पोलिसांनी लक्षात घेऊन गुन्हा दाखल करणे अपेक्षित होते. मात्र दोन दिवस उलटून ही अवमान करणाऱ्या माने याच्यावर गुन्हा दाखल करण्यास पोलीस नकार देत आहेत. तसेच पोलीस वरिष्ठांची नावे सांगून उडवा- उडविची उत्तरे देत असल्याने कऱ्यकरतेमध्ये असंतोष पसरला आहे. अशा नगण्य घटनांमधून पोलीस प्रशासनावर अनेक प्रश्न उपस्थीत होत असून रत्नागिरी पोलिस प्रशासनाची प्रतिमा देखील मलीन होत आहे.
पोलिसांवर राजकीय दबाव
अवमानकारक विधान करणारा विजय माने हा आमदार उदय सामंत व किरण सामंत यांचा कट्टर समर्थक असल्याचे समोर आले आहे. पोलिस प्रशासनाच्या संशयास्पद भुमिकेवरून या प्रकरणात पोलिसांवर राजकीय दबाव आहे का? असा देखील प्रश्न आता निर्माण होत आहे.
तमाम आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरेल
या प्रकरणाबाबत आंबेडकरी जनतेमधून रोषाच वातावरण आहे. संबधित व्यक्तीवर प्रशासनाने कारवाई करून न्याय दिला नाही तर तमाम आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरेल यातून आचारसंहितेचा भंग होऊ शकतो, एखादी ठिणगी पडली तरीही प्रशासनाला ते महागात पडेल.
– प्रदीप पवार (जिल्हाध्यक्ष, रत्नागिरी भीम आर्मी )
अरे म्हटल्या शिवाय कारे होत नाही. त्यामुळे ज्याने कोणी समाजकंठकाने हे कृत्य केले आहे. त्याचा आंबेडकरी जणता निषेध व्यक्त करीत आहे. आम्हाला योग्य न्याय द्यावा अन्यथा आम्हाला सुद्धा कायदा हातात घेता येतो एवढं प्रशासनाने इतकं लक्षात ठेवावं.
– भाई जाधव (अध्यक्ष, खंडाळा विभाग बावीस खेडी संघटना )