(ठाणे)
विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला मोठं बहुमत मिळालं, तर महाविकास आघाडीला पराभवाचा धक्का बसला. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील तब्बल १२८ उमेदवार राज्यभरात विविध मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरवले होते. मात्र, १२८ उमेदवारांपैकी एकही उमेदवार निवडून आला नाही. त्यामुळे या निवडणुकीत मनसेला मोठा धक्का बसला. या पराभवामध्ये मनसेचे नेते अविनाश जाधव यांचाही समावेश आहे. “विधानसभा निवडणुकीत ठाणे आणि पालघर येथील पराभवाची जबाबदारी घेऊन मी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. काम करताना माझ्याकडू कळत-नकळत काही चूक झाली असल्यास आपण माफ करावे”, असं अविनाश जाधव यांनी पत्रात म्हटलं आहे.
दरम्यान, अविनाश जाधव यांच्याकडे ठाणे आणि पालघरचं जिल्हाध्यक्ष पद आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्यात अविनाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उमेदवारांनी निवडणुका लढवल्या होत्या. अविनाश जाधव यांनी सुद्धा ठाणे शहर मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. पण त्यांचा या मतदारसंघातून भाजपचे उमेदवार संजय केळकर यांनी पराभव केला. या मतदारसंघात अविनाश जाधव हे तिसऱ्या क्रमांकावर होते. ठाणे जिल्ह्यातील मनसेच्या इतर उमेदवारांचाही पराभव झाला. अखेर अविनाश जाधव यांनी ठाणे आणि पालघर जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. आता राज ठाकरे आता त्यांचा हा राजीनामा मान्य करतात की नाही किंवा अन्य काही निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
या पार्श्वभूमीवर ठाणे आणि पालघर जिल्ह्यात मनसेत असलेला अंतर्गत वादही विधानसभा निकालानंतर चव्हाट्यावर आला आहे. पालघरचे मनसे जिल्हाध्यक्ष समीर मोरे यांना जबर मारहाण करत त्यांचे बंधू आतिश मोरे यांच्यावर पंधरा ते वीस मद्यधुंद अवस्थेत असलेल्या गावगुंडानी धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केला असून हा हल्ला ठाणे मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केल्याचा आरोप मोरे कुटुंबीयांकडून केला जात आहे.
अविनाश जाधव यांनी रविवारी दुपारच्या सुमारास आपल्या पदाचा राजीनामा दिल्याच्या बातम्या प्रसारित झाल्यानंतर अवघ्या काही वेळातच बोईसरमध्ये हा सगळा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जिल्हाध्यक्ष समीर मोरे यांना लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण करत त्यांचे बंधू अतिश मोरे यांच्यावर कोयते, तलवार, चाकू अशा धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला करण्यात आला असून जखमी असलेल्या मोरे यांच्यावर सध्या बोईसरच्या शगुन रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पालघर आणि ठाणे जिल्ह्यात मनसेत मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या अंतर्गत वादाचा रूपांतरण थेट जीवघेण्या हल्ल्यापर्यंत गेल्यानंतर आता मनसेचे वरिष्ठ नेते काय निर्णय घेतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे . दरम्यान पालघर मधील मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी रविवारी राज ठाकरेंची भेट घेऊन पराभवाची कारण सांगितली . यावेळी मनसे नेते अविनाश जाधव यांनी निवडणूक काळात दिलेली जबाबदारी पार पाडली नसल्याची तक्रार काही मनसे पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांना केल्यानंतर राज ठाकरे यांनी अविनाश जाधव यांची कानउघाडणी केली आणि हाच राग मनात धरून अविनाश जाधव यांनी हा हल्ला केल्याचं मोरे यांच्या सहकाऱ्यांकडून सांगण्यात येते.