(रत्नागिरी)
रत्नागिरीतील मानाचे आणि नवसाला पावणारे गणपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मारूती मंदिर येथील श्री रत्नागिरीचा राजा आणि आठवडा बाजार येथील रत्नागिरीचा राजा या दोन्ही गणपतींना बुधवारी भावपूर्ण निरोप देण्यात आला. दोन्ही राजांच्या विसर्जन मिरवणुकांमध्ये रत्नागिरीकर मोठ्या भक्तीभावाने सहभागी झाले होते. अगदी वाजत-गाजत अशी मिरवणुक काढून दोन्ही राजांचे रात्री उशिराने विसर्जन करण्यात आले.
मारूती मंदिर येथील श्री रत्नागिरीचा राजाच्या विसर्जन मिरवणुकीत ना. सामंत यांच्यासह श्री रत्नागिरीचा राजा मंडळाचे अभिजित गोडबोले, यांच्यासह सर्व पदाधिकारी सहभागी झाले होते. दोन्ही मिरवणुकांना सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास प्रारंभ झाला. या दोन्ही राजांच्या मिरवणुका पाहण्यासाठी रत्नागिरीकरांनी मोठी गर्दी केली होती. सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी राजाची मिरवणुक रामआळीत तर श्री रत्नागिरीचा राजाची मिरवणुक एसटी स्टॅण्ड येथे होती. दोन्ही मिरवणुका फारच आकर्षक पद्धतीने मार्गक्रमण करत होत्या.
दोन्ही मिरवणुकांमधील मार्गांमध्ये वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून वाहतुक पोलीसांनी तसेच कार्यकर्त्यांनी नियोजन केले होते. दोन्ही मंडळातील पदाधिकारी काळजी घेत होते. रात्री उशीरा दोन्ही राजांचे विसर्जन करण्यात आले. जयगडच्या राजालाही निरोप देण्यात आला. जयगडचा राजा मित्रमंडळाकडून जयगड- संदखोल येथे जयगडच्या राजाची प्रतिष्ठापना करण्यात येते.