(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड गावचे प्रसिद्ध उद्योजक विनायक उर्फ दादा सदाशिव केळकर यांचे बुधवारी रात्रीच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरी दीर्घ आजाराने निधन झाले. ते 84 वर्षांचे होते. “दादा” या टोपण नावाने हे सर्वत्र ओळखले जात. त्यांनी आपल्या आयुष्यात नामवंत उद्योजक म्हणून आंबा व्यवसायात मोठी भरारी घेतली. या व्यवसायात त्यांनी आपले नावलौकिक मिळवून मालगुंड आणि नेवरे या ठिकाणी आंब्याच्या मोठ्या फॅक्टरी निर्माण केल्या. केळकर उद्योग समूहाचे ते सर्वेसर्वा होते.
या समूहाचे त्यांनी सर्वेसर्वा म्हणून काम करताना हॉटेल व्यवसायात पदार्पण केले यावेळी हॉटेल व्यवसायात देखील त्यांनी मोठी यशस्वी वाटचाल निर्माण केली. त्यांचे गणपतीपुळे येथील हॉटेल दुर्वांकुर उत्तम निवासासाठी आणि उत्तम भोजनासाठी प्रसिद्ध आहे. मालगुंड पंचक्रोशीतील एक नामवंत उद्योजक म्हणून त्यांनी आपले नाव कमावताना सामाजिक कार्यात ही आपली विशेष झलक दाखवली. त्यामध्ये त्यांनी मालगुंड ग्रामपंचायतीचे सुमारे पंधरा वर्षे सदस्य म्हणून काम केले. तसेच मालगुंड एज्युकेशन सोसायटीमध्ये सुमारे नऊ वर्षे संचालक पदावर काम केले. त्यांना सामाजिक कार्याची विशेष आवड होती.
त्यांनी आपले कुटुंब टिकवण्याचे काम अतिशय जबाबदारीने केले. त्यांचे केळकर कुटुंब खूप मोठे आहे. या कुटुंबात सर्व एकोप्याने आणि एकसंघ राहून त्यांनी आपल्या कुटुंबाचा आदर्श इतरांसमोर निर्माण केला. आजही त्यांची एकत्रित कुटुंब पद्धती इतरांसाठी आदर्शवत ठरत आहे. मालगुंड बाजारपेठेमध्ये त्यांचे किराणामालाचे दुकान विशेष प्रसिद्ध आहे. त्यामध्ये देखील त्यांनी एक नामवंत व्यवसायिक म्हणून आपली संपूर्ण मालगुंड पंचक्रोशीमध्ये वेगळी ओळख निर्माण करून लोकांमध्ये विश्वासार्हता निर्माण केली.
अतिशय शांत, प्रेमळ व मनमिळावू असे त्यांचे व्यक्तिमत्व सर्वांना विशेष भावणारे होते. त्यांनी आयुष्यभर माणसे जोडण्याचे काम केले. त्यांच्या आकस्मिक निधनाची बातमी समजताच विविध क्षेत्रातील मान्यवर अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. त्यांच्यावर मालगुंड गायवाडी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने एक कणखर व यशस्वी उद्योजक हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, मुले, भाऊ बहिणी असा मोठा परिवार आहे.