(पुणे)
पुण्यासह लगतच्या परिसरातील न्यायालयांमध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे खोटे जामीनदार देणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला असून, यासंदर्भात लष्कर न्यायालयात पोलिसांनी सापळा रचून दोन वकिलांसह पाच जणांना अटक केली. टोळीचा म्होरक्या गर्दीचा फायदा घेऊन पसार झाला. ॲड योगेश सुरेश जाधव (४३, रा. हडपसर) व अँड. अस्लम गफूर सय्यद (४५, रा. वैदुवाडी, हडपसर) ही संशयित आरोपी असलेल्या वकिलांची नावे आहेत. त्याचबरोबर दर्शन अशोक शहा (४५, रा. सोलापूर बाजार, कॅम्प), पिराजी ऊर्फ चंद्रकांत मारुती शिंदे (६०, रा. मोशी) आणि गोपाळ पुंडलिक कांगणे (३५, रा. मोरवाडी, पिंपरी) यांनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. संतोषकुमार शंकर तेलंग व अन्य पाच बनावट जमीनदारांना ताब्यात घेतले असून, अन्य आरोपींचा शोध जारी करण्यात आला आहे. संशयित आरोपीकडून बनावट शिक्के व कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. तपासासाठी आरोपींना पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.परिमंडळ-५चे पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी ही माहिती सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
पुणे शहर व जिल्ह्यातील अनेक गंभीर गुन्ह्यांतील आरोपी जामिनावर मुक्त होण्याचे अलीकडच्या काही काळात प्रमाण वाढले आहे. मुळात पोलीस यंत्रणेने जामीनदारांबाबत अवलंबलेले कडक धोरण लक्षात घेता या आरोपींना जामीन नेमके कोण राहते, याबाबत पोलिसांनी तपास केल्यावर हे जामीनदार बनावट असल्याची माहिती पुढे आली. त्यामुळे या खोट्या जामीनदारांचा शोध जारी करण्यात आला होता. त्याबाबत वानवडी पोलीस ठाण्याच्या पथकाला या टोळीच्या कार्यपद्धतीचा सुगावा लागला. त्याबाबत या पथकाने लष्कर न्यायालयात सापळा रचून ही टोळी जेरबंद केली. टोळीचा म्होरक्या तेलंग जामिनाच्या शोधात असलेल्या गुन्हेगारांना हेरत असे. तो घसघशीत रकमेच्या बदल्यात जामीनदार देण्याची तयारी दर्शवायचा. त्यानंतर भलत्याच व्यक्तींची रेशनकार्ड, आधारकार्ड व अन्य कागदपत्रांमध्ये फेरफार करून ही टोळी निराळ्याच व्यक्तीला जामीनदार म्हणून न्यायालयात उभे करायची.
ॲड. जाधव व ॲड सय्यद यांच्या मदतीने ते हा सगळा फेरफार करीत असत. त्यामध्ये न्यायालयातीलही काही कर्मचारी सामील असावेत, असा पोलिसांचा अंदाज आहे. संशयित आरोपींच्या घरांची झडती घेतल्यावर अनेक बनावट शिधापत्रिका, बनावट ओळखपत्रे, शिक्के पोलिसांच्या हाती लागले. या टोळीची व्याप्ती मोठी असून त्यामध्ये आणखी काही आरोपींना अटक केली जाण्याची शक्यता आहे.