( संगमेश्वर / प्रतिनिधी )
भाऊ निसर्गात फिरून वन्य जीवांच्या हालचालींचे निरीक्षण करत त्यांची हजारो छायाचित्र टिपणारा. तर बहीण मानवी मनाचा ठाव घेत त्याचा प्रतिबिंब आपल्या चित्रातून साकारणारी. या दोघांचा गेल्या अनेक वर्षांचा प्रवास त्यांच्या छायाचित्रासह, उत्तमोत्तम कलाकृतीतून संगमेश्वर तालुक्यातील कलारसिकांना देवरुख कला महाविद्यालय अर्थात डीकॅड येथे २८ ते ३० सप्टेंबर या कालावधीत प्रदर्शनाच्या माध्यमातून सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत सर्वांनाच पाहता येणार आहे. या प्रदर्शनाचा संगमेश्वर तालुक्यातील कलारसीकांसह जिल्हावासियांनी लाभ घ्यावा असे आवाहन देवरुख कला महाविद्यालयाचे प्राचार्य रणजीत मराठे आणि निखिल – रुचिता जांभळे यांनी केले आहे.
मानवी जीवन हे प्रवाही आहे, या प्रवाहाला जेंव्हा कलेची साथ मिळते तेंव्हा कला आणि कलाकार हे दोघेही जगासमोर जगण्याचा एक नवा दृष्टिकोन समोर आणतात. माणसाच्या मूलभूत गरजा पूर्ण झाल्यानंतर माणूस आणखी एका गोष्टीच्या शोधात असतो, ती म्हणजे आनंद ! या आनंदाची शोधयात्रा म्हणजे कला. अशाच आनंद यात्रेच्या शोधात निघालेली दोन भावंडं एकाच आईच्या पोटी जन्मले म्हणून भावंडं तर होतीच पण या दोघांची नाळ अजून एका गोष्टी सोबत जोडल्या गेली होती ती म्हणजे कला. सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या देवरूख या गावातून निखिल विलास जांभळे आणि कु. रुचिका विलास जांभळे यांचा कलेचा प्रवास सुरु झाला.
मध्यम वर्गीय घरातून सुरु झालेला हा प्रवास सहज आणि सोपा नव्हता पण कुटुंबाची सोबत आणि आत्मविश्वास यांच्या सोबतीने दोघांनीही समाजाने आखून दिलेल्या प्रवाहा विरुद्ध जाऊन स्वतःचा प्रवाह निर्माण केला. निखिल हे एक वन्यजीव अभ्यासक आहेत, गेल्या ८ वर्षांपासून त्यांनी महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, मध्य प्रदेश अशा ठिकाणी वन्यजीव संशोधन, संवर्धन आणि त्याबाबत शिक्षण यावर काम केलं आहे, हे सर्व करत असतांना त्यांनी त्यांच्या छायाचित्रांतून निसर्गाचे अनेक रहस्य आपल्या कॅमेरात सामावून घेतले. आपल्या भावाप्रमाणेच रुचिका हिने ग्राफिक डिझाईनचे शिक्षण घेऊन त्यात आपलं प्रभुत्व साध्य करत असतांना मानांच्या आंतरिक भावनांना आपल्या चित्रकलेतून रेखाटायला सुरुवात केली. लिओनाडों द व्हींची, पॅब्लो पिकासो, यांचा वारसा पुढे नेत लाईन आर्ट द्वारे रुचिकाने माणसाच्या मनातल्या अनेक भावना कागदावर अगदी सहज रेखाटल्या आहेत.
आनंदाच्या शोधयात्रेत या दोघांनीही तयार केलेल्या कलाकृतींचे प्रदर्शन आपल्या सर्वांसाठी २८ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर, सकाळी १० ते संध्याकाळी ६ यावेळेत डी कैंड देवरुख कॉलेज ऑफ आर्ट अँड डिझाईन भागवत संकुल, मधली आळी देवरुख, तालुका संगमेश्वर, येथे सर्वांसाठी खुले असणार आहे. चित्रार्थ या नावाने प्रदर्शित होणाऱ्या प्रदर्शनाचे उदघाट्न नेहा माने, बाबा सावंत, संजू पटेल, प्रफुल्ल भुवड, राजू जागुष्टे, वेदा फडके अशा देवरुख मधील मान्यवरांच्या हस्ते आणि उपस्थितीत होणार आहे. माणूस म्हणून आपल्या भावनांना चित्रांद्वारे बघण्यासाठी आणि निसर्गाचा घटक म्हणून या निसर्गाला जपण्यासाठी आपण सर्वांनी नक्की भेट द्या असे आवाहन निखिल आणि रुचिता जाभंळे यांनी केले आहे.