(रत्नागिरी / प्रतिनिधी)
जिल्ह्यातील वय वर्षे ५५ वरील अधिकारी, कर्मचारी आणि शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांना निवडणुक कामगिरीतून वगळण्यासंदर्भात कास्ट्राईब कर्मचारी महासंघांच्या जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांनी रत्नागिरी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांच्याकडे निवेदन सादर केले.
सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सद्यःस्थितीत वय वर्षे ५५ पुढील अधिकारी/कर्मचारी आणि शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी हा त्यांचेकडे असलेल्या जादा कामगिरीमुळे ग्रासलेला आहे. त्याच्या वैयक्तीक व शासकीय अडचणीमुळे काही कर्मचारी शारीरिक दृष्ट्या ब्लडप्रेशर, मधुमेहाने किंवा अन्य आजाराने त्रासलेले असल्याचे निर्दशनास येत आहे.
कामाच्या ताण- तणावामुळे त्यांची काम करण्याची मनस्थिती खचलेली व शरिराने खंगलेली दिसते, अशा परिस्थितीत निवडणूक कामात काही चूका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वय वर्षे ५५ वरील अधिकारी / कर्मचारी आणि शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी यांना येणाऱ्या निवडणुक कामगिरीतून वगळण्याची मागणी दिलेल्या निवेदनातून केली आहे.