(पुणे)
माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाचे पुण्यातून अपहरण झाल्याचा निनावी फोन पोलीस कंट्रोल रुमला होता. पुणे विमानतळावरुन ऋषीराज सावंत यांचे अपहरण करण्यात आल्याची माहिती फोन करणाऱ्या व्यक्तीने पोलीस कंट्रोल रुमला दिली. तर ऋषीराज सावंत यांचे अपहरण झाले नसून ते फिरायला गेल्याची माहिती तानाजी सावंत यांच्या स्वीय सहायकाने दिली आहे.
दरम्यान, तानाजी सावंत यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी वाऱ्याच्या वेगाने सूत्रे फिरवत अवघ्या चार तासांत बँकॉकला जाणारे विमान हवेतूनच माघारी फिरवत सावंतांचा मुलाला पुण्यात लँड करण्यास भाग पाडले. स्पेशल चार्टर विमानाने ऋषिराज बँकॉकला जात असल्याचे पोलिसांना समजताच पोलिसांनी सुत्रे हलवली. बजाब एव्हिएशनच्या फाल्कन २००० एलएक्स नावाच्या खासगी विमानाने ऋषीराज सावंत तीन मित्रांसह बँकॉकला जायला निघाला. पुणे पोलिस आयुक्तांनी एअर इंडिया ऑथॉरिटीमार्फत सूत्रे हलवून हवेतूनच विमान मागे फिरवले. त्यामुळे पोलिसांना कॉल करून खोटी माहिती दिली? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
पोलिस व तानाजी सावंत यांनी आपली शक्ति पणाला लावून चेन्नई येथे पोहचलेले विमान पुन्हा परत मागवले. यानंतर ऋषीराज सावंत यांना चेन्नईतून पुण्यात आणण्यात आले आहे. दरम्यान, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याने ऋषीराज सावंत यांची चौकशी केली जाणार असून नेमकं काय घडलं याची देखील माहिती घेऊन योग्य कारवाई केली जाईल, तसेच त्यांचा पुणे ते चेन्नई प्रवासाची देखील माहिती घेतली जाईल असे शर्मा यांनी म्हटलं आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सोमवारी संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास पोलिसांच्या कंट्रोल रुमला एक फोन आला. राज्याचे माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाचे अपहरण झाले आहे. पुणे विमानतळावरुन पांढऱ्या रंगाच्या स्विफ्टमधून अपहरण झाल्याची माहिती कॉल करणाऱ्या व्यक्तीने पुणे पोलिसांना दिली. या निनावी कॉलनंतर पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने हलवली. त्यानंतर पोलीस अधिकारी तानाजी सावंत यांच्या कात्रजमधील निवासस्थानी पोहोचले. पोलिसांना अपहरणाचा फोन आला असल्याने सावंत यांना कोणी खंडणीची मागणी करणारा फोन केला होता का? याची चौकशी सुरु झाली. अपहरण झालेल्या मुलाच्या सुटकेसाठी पोलिसांकडून शहरात वेगवेगळ्या ठिकाणी नाकेबंदी करण्यात आली. पोलीस उपायुक्त स्वत: रस्त्यावर उतरुन परिस्थितीचा आढावा घेत होते. संबंधित प्रकरण माजी मंत्र्याच्या मुलाशी संबंधित असल्याने पोलिसांकडून कोणतीही माहिती दिली गेली नाही.
माजी आरोग्य मंत्री आणि शिवसेना नेते तानाजी सावंत यांचा मुलगा पुणे विमानतळावरून बेपत्ता झाल्यावर सिंहगड रोड पोलिस ठाण्यात या प्रकरणी अपहरणाची तक्रार देण्यात आली होती. या सगळ्यात सावंतांनी थेट पोलिस आयुक्तांचे कार्यालय गाठून पत्रकार परिषद घेतली.
पोलिसांकडून ऋषिराज सावंत यांचा शोध सुरु असतानाच तानाजी सावंत यांच्या स्वीय सहायकांनी त्यांचे अपहरण झाले नसून ते फिरायला गेले असल्याची माहिती दिली. त्यामुळे पोलिसांना कोणी तरी फोन करुन फेक कॉल केला का? याचा शोध घेण्यात येत आहे. पोलिसांनी याप्रकरणी सांगितले की, ऋषिराज सावंत आणि त्यांच्या दोन मित्रांना बँकॉकहून पुन्हा पुण्यात आणले आहे. ते पुण्यातून बँकॉकच्या दिशेने निघाल्याची माहिती पोलिसांनी दिली. मुळात सावंत यांच्या कुटुंबियांना कोणत्याच प्रकारची माहिती नसल्याने त्यांनी आयुक्तालयात धाव घेतली होती. त्यातच पोलिसांनाही ऋषिराज सावंत यांचे अपहरण झाल्याचे माहिती असल्याने पोलिसांनी एफआयआर दाखल करून तपासाला सुरुवात केली होती. तरी पोलीस आता ऋषिराज सावंत कुटुंबियांना न सांगून अचानक असे का जात होते, याची चौकशी करणार आहे.
दरम्यान तानाजी सावंत म्हणाले की, हे बेपत्ता आहे की अपहरण याबद्दल आम्हाला नेमकं माहित नव्हते. त्यांच्यासोबत जे होते ते त्याचे मित्र होते, त्याच्या गाडीतून जाण्याच्या ऐवजी त्याच्या मित्राच्या गाडीतून तो गेला. तसेच कुठे जात आहे याची माहिती मला नसल्याने मी काळजीमुळे लगेच पोलिसांना याबद्दल माहिती दिली. फोन केल्याशिवाय तो कुठेही जात नाही, मात्र आज तसे झाले म्हणून मी पोलिसांत तक्रार दाखल केली. तसेच याबद्दल माहिती मला आमच्या चालकाकडून मिळाली की मी त्यांना विमानतळावर सोडून आलो. पण मला याची कल्पना नव्हती. म्हणून मी पोलिसांशी संपर्क साधला, असे ते म्हणाले. तसेच आमच्यात कोणत्याही प्रकरचा कौटुंबिक वाद झाला नसल्याचेही सावंत म्हणाले. त्यामुळे पोलिस तपासानंतरच प्रकरणाची अधिक माहिती मिळणार आहे.