(रत्नागिरी)
रत्नागिरी शहरात सुधारित नळ पाणी योजना राबविण्यात आली आहे. २०१६ मध्ये मंजूर झालेल्या या सुधारित नळ पाणी योजनेची कामाची ऑर्डर २०१७ मध्ये निघाली. अद्यापही गेल्या आठ वर्षांच्या काळात या योजनेचे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे रत्नागिरी शहरवासीयांना पावसाळ्यातही दर दिवसाआड पाणी पुरविले जाते.
पावसाळ्यातही लोकांना नियमितपणे पाणी मिळू नये ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. त्यामुळे धरणांमधील पाण्याचे योग्य नियोजन करून पावसाळ्यात रत्नागिरीकराना 24 तास पाणी द्यावे, अशी मागणी करणारे निवेदन शरद पवार राष्ट्रवादीचे नेते आणि रत्नागिरीचे माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर, रत्नागिरी शहराध्यक्ष निलेश भोसले यांनी रत्नागिरी नगरपरिषद मुख्याधिकारी यांना दिले आहे. गेली काही वर्षे रत्नागिरीकरांना पाणी योजना मंजूर होऊन पावसाळ्यातही पाणीबाणीला सामोरे जावे लागत आहे.
रत्नागिरी शहरासाठी राज्य शासनाने मंजूर केलेली सुधारित नळ पाणी योजना ही दोन वर्षात पूर्ण करावयाची होती परंतु आठ वर्षे झाली तरी ही योजना अद्याप पूर्ण झालेली नाही. नागरिकांचा पाण्याचा प्रश्न तसाच प्रलंबित आहे. ज्या ठेकेदाराला या पाणी योजनेचे कंत्राट देण्यात आले. त्यांच्याकडून हलगर्जीपणा करण्यात आला आणि या योजनेचे आतापर्यंत झालेले काम हे निकृष्ट दर्जाचे आहे. असा आरोप आहे मिलिंद किर यानी या निवेदनात केला आहे. पानवल धरण ते नाचणे फिल्टर प्लांट तसेच शीळ धरण ते जॅकवेल पर्यंतच्या पाईपलाईनचे काम अद्यापही झालेले नाही. सुधारित नळ पाणी योजनेनुसार 24 तास पाणी देण्याचे नियोजन असतानाही त्याची पूर्तता अद्याप झालेली नाही. ठरलेल्या नियोजनाप्रमाणे पानवल धरणाची दुरुस्ती करावी. गेल्या वर्षीही रत्नागिरी शहरातील पाणी समस्येबाबत आपल्याला निवेदन दिले होते. त्यावेळी आपण झोन प्रमाणे काम करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र यावर्षी पर्यंत त्याची पूर्तता झालेली नाही. आपण जनतेला 24 तास पाणी देण्यापासून बंचित का ठेवले आहे असा सवालही मिलिंद किर यानी या निवेदनात केला आहे.